( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sairat Salya Arbaj Shaikh : ‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजता त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारांसाठी मदतीची आर्त विनंती केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनाही भावूक करत आहे.
व्हिडिओमध्ये अरबाज शेख म्हणतो, “मी सध्या सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवसांपूर्वी माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांना हृदयाशी संबंधित त्रासही होता, त्यामुळे आम्ही त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, इथला अनुभव माझ्यासाठी अत्यंत वाईट ठरला.”
अरबाजच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल करताना १० हजार रुपयांचे डिपॉझिट भरावे लागले. त्यानंतर औषधांची यादी देत ती रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्यास सांगण्यात आले. “तीच औषधे बाहेरच्या मेडिकलमध्ये जवळपास अर्ध्या किमतीत उपलब्ध होती. रुग्णालयातून घेतलेल्या औषधांचे बिल ४० हजार रुपयांहून अधिक झाले, तर बाहेरून तीच औषधे सुमारे २० हजार रुपयांत मिळाली असती,” असा दावा त्याने केला.
View this post on Instagram
भावनिक होत अरबाज पुढे म्हणाला, “एवढी लूट होत आहे. पण मला माझ्या बापाला मरताना पाहायचं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. आता वडिलांवर कुठे उपचार करावेत, काय करावं, हेच कळत नाही. काहीही करून मला माझ्या बापाला वाचवायचं आहे. कृपया मला मदत करा.”
पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “आत्ता मी खूप आर्थिक अडचणीत आहे. तरीही माझ्या वडिलांचे उपचार सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करा किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची छोटीशी मदतही माझ्यासाठी खूप मोठी ठरेल.” गुगल पे नंबर 8888515473. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करा किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावा. यासोबतच त्याने ऑनलाइन आर्थिक मदतीसाठी आपला Google Pay क्रमांकही शेअर केला आहे.






