फोटो सौजन्य - Social Media
प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘कल्की 2898 एडी’ ने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. त्याचवेळी, आता सर्वांच्या नजरा त्याच्या सीक्वलशी संबंधित अपडेट्सवर खिळल्या आहेत. ‘कल्की 2’मध्ये साऊथचा सुपरस्टार महेश बाबू भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, या अहवालांमध्ये किती तथ्य आहे? याचा खुलासा स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी केला आहे. कल्की चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीस या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. जो पाहण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.
‘कल्की 2898’ मध्ये भगवान श्रीकृष्णाची झलक पाहायला मिळणार
‘कल्की 2898 एडी’ मध्ये, भगवान कृष्णाचे पात्र सावलीच्या रूपात दाखवण्यात आले होते आणि अभिनेता कृष्णकुमार बालसुब्रमण्यम यांनी ही भूमिका साकारली होती. या सर्जनशील निर्णयामुळे महेश बाबू आणि नानी यांसारखी नावं समोर आल्याने सिक्वेलमध्ये भूमिका साकारण्यासाठी संभाव्य अभिनेत्यांबद्दल अटकळ बांधली गेली. या बातमीचे आता चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.
नाग अश्विनचे मोठे वक्तव्य
या अहवालांना संबोधित करताना दिग्दर्शक नाग अश्विन म्हणाले, ‘मला कल्की ब्रह्मांडात भगवान कृष्णाचा चेहरा दाखवायचा नव्हता. पण, जर एखादी परिपूर्ण भूमिका असेल, तर महेश बाबू त्यासाठी सर्वोत्तम असतील असे मला वाटते. महेश बाबूने भगवान कृष्णाची भूमिका साकारली तर हा सिक्वेल नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास त्यांना आहे.’ असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘मला विश्वास आहे की हा चित्रपट प्रचंड कलेक्शन करेल.’ बाबूने कधीही पौराणिक चित्रपटात काम केले नसले तरी, अश्विनने ‘खलेजा’ मधील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले’, जिथे त्याने दैवी पात्र साकारले होते.
नाग अश्विनच्या वक्तव्याने उत्साह वाढला
अश्विन म्हणाला, ‘कृष्णाच्या भूमिकेत आपण त्याची कल्पना करू शकतो. मला खात्री आहे की तो ते करेल.’ असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चाहत्यांमध्ये आतुरता निर्माण झाली आहे. सध्या, अभिनेता महेश बाबू एसएस राजामौली यांच्या पुढील ॲक्शन-साहसी चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2025 मध्ये सुरू होणार आहे. जर अश्विन आणि बाबू यांच्यात टीम-अप झाली, तर कल्की ब्रह्मांडच्या स्टार-स्टडेड कास्टचा विचार करता हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात मोठा कास्टिंग चित्रपट ठरू शकतो.