(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील सर्वांत गाजलेली ऑन-स्क्रीन जोडी शाहरुख खान आणि काजोल यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जादूने रंगमंच गाजवला. त्यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमधील गाण्यांवर एकत्र रोमँटिक डान्स केला आहे. ११ ऑक्टोबर २०२५, शनिवार या दिवशी पार पडलेल्या ७०वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्मन्स केला परंतु शाहरुख-काजोलच्या परफॉर्मन्सने संपूर्ण वातावरण भारावून गेलं. या दोघांचा जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.’सूरज हुआ मद्दम’ व ‘ये लडका है दीवाना’ या गाण्यांवर त्यांनी जबरदस्त डान्स केला. नेटकरी त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करीत आहेत. ते ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कुछ कुछ होता है’मधील गाण्यांवर डान्स करताना दिसले.
हा रोमँटिक डान्सचा व्हिडिओ Filmfare च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, काही तासांतच तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अनेक कमेंट्स या व्हिडिओवर केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे, “ही जोडी कधीच जुनी होत नाही, आजही तितकीच खास आहे”.या डान्सने अनेक चाहत्यांच्या आठवणी ताज्या केल्या असून, सोशल मीडियावर “King & Queen of Romance”, “Pure Magic”, “DDLJ Nostalgia” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
या खास कार्यक्रमादरम्यान, त्यांनी ‘लडकी बडी अंजानी है’ या गाण्यावर सिग्नेचर स्टेप्ससह नृत्य सादर करत, त्यांच्या १९९८ सालच्या सुपरहिट चित्रपटातील पात्रांना पुन्हा जिवंत केलं. शाहरुखने काळ्या टक्सेडोमध्ये तर काजोलने काळ्या साडीमध्ये, त्यांच्या जुन्याच जादुई रूपात मंचावर एन्ट्री घेतली.
‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?
प्रेक्षकांमध्ये बसलेले चाहते टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष करताना दिसले. काहीजण तर भावनाविवश होऊन डोळे पुसताना ही दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून, नेटिझन्स त्यांना “सर्वकालीन बेस्ट ऑन-स्क्रीन जोडी” म्हणून गौरवित आहेत.
या जोडीने पहिल्यांदा एकत्र काम केलं १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ या थरारक चित्रपटात. या चित्रपटात शाहरुखचा ग्रे शेड असलेला रोल आणि काजोलची सहज भूमिका प्रेक्षकांना भावली — आणि एक धमाकेदार जोडीचा जन्म झाला.