फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त, देशभक्तीपर ‘बॉर्डर २’ चित्रपटाचा पहिला लूक आणि प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘बॉर्डर २’ चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर करून निर्मात्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सर्वत्र स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. आणि या खास प्रसंगी सनी देओलने त्याच्या चाहत्यांना ‘बॉर्डर’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून खुश केले आहे. चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची आता उत्सुकता लागली आहे.
सनी देओल तोफ घेऊन उत्साहात दिसला
निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये सनी देओल खांद्यावर तोफ घेऊन जाताना दिसत आहे. ‘बॉर्डर’ चित्रपटात दिसलेल्या पगडी घातलेल्या सनी देओलच्या डोळ्यातही तोच उत्साह आणि जोश दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये ‘हिंदुस्तान हिंदुस्तान’ हे गाणेही बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. तसेच, लष्कराचे जवान तिरंगा फडकवताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये चित्रपटातील इतर कलाकारांची नावेही लिहिली आहेत, ज्यामध्ये सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची नावे आहेत.
बॉर्डर २ च्या प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्ट रोजी का जाहीर केली
बॉर्डर २ चे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख का निवडण्यात आली? या प्रश्नावर दिग्दर्शक अनुराग सिंह म्हणाले की, देशभक्तीच्या भावनेवर आधारित या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्ट रोजी जाहीर करणे हे केवळ प्रतीकात्मक आहे. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो आणि आपला चित्रपटही तेच करतो. या कथेद्वारे त्यांच्या अमर आत्म्याचा सन्मान करणे हा एक सन्मान आणि सौभाग्य आहे.”
चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार काय म्हणाले?
बॉर्डर २ चे निर्माते भूषण कुमार म्हणाले, बॉर्डर हा चित्रपटापेक्षा काही खास आहे. तो प्रत्येक भारतीयासाठी एक भावना आहे. बॉर्डर २ सह, आमचा उद्देश तो वारसा पुढे नेणे आणि तो नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आहे. निर्मात्या निधी दत्ता म्हणाल्या, “पहिली बॉर्डर ही आपल्या सशस्त्र दलांना मनापासून सलाम होती. यावेळी आम्ही त्याच जोशाने, एका नवीन कथेने आणि प्रत्येक थिएटरमध्ये तोच अभिमान आणि अश्रू जागृत करण्याचे वचन घेऊन परतत आहोत.”
बॉर्डर २ हा चित्रपट येत्या नव्या वर्षात २२ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर खूपच लक्षवेधी आहे. तसेच, या चित्रपटामध्ये तगडा स्टारकास्ट प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार आहे. आता या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.