फोटो सौजन्य: सोशल मीडिया
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भाष्य करणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. देशासह परदेशात चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये भलतीच क्रेझ आहे. चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असताना चित्रपट सुरु असताना थिएटरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गुजरातमधील भरुचमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. ‘छावा’ चित्रपटाचा रात्री शो सुरु असताना एका प्रेक्षकाने थिएटरचा व्हाईट पडदाच फाडला. बराच गोंधळ झाल्यानंतर पडदा फाडणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान इतर प्रेक्षकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या ‘छावा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्याच दरम्यान आत आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गुजरातच्या भरूचमधील आरके थिएटरमध्ये, ‘छावा’ चित्रपटाची स्क्रिनिंग सुरु असताना एक विचित्र घटना घडली आहे. रविवारी रात्री आरके थिएटरमध्ये, रात्री ११.४५ चा शो सुरू असताना एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला. बराच गोंधळ झाल्यानंतर या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान इतर प्रेक्षकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू असताना सदर प्रेक्षक चवताळला आणि त्याने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिएटरचा पडदा फाडणाऱ्या आरोपीचं नाव जयेश वसावा असं आहे. तो चित्रपट पाहत असताना शुद्धीत नव्हता. चित्रपटात शेवटचा सीन सुरू असताना तो धावत पडद्याजवळ गेला आणि तेथे असलेल्या अग्निशामक यंत्राने त्याने पडद्याचे नुकसान केले. मल्टिप्लेक्सचे कर्मचारी धावत येईपर्यंत त्याने मोठ्या प्रमाणावर पडदा फाडला. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी आरोपी जयेश वसावाला अटक केली असून त्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी साकारला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटातील एका गाण्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर चित्रपटातून एक गाणं काढून टाकण्यात आलं होतं. पण, अखेर चित्रपटाला लागलेली वादाची किनार दूर झाली आणि चित्रपट रिलीज झाला.
Fussclass Dabhade Movie: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची सातासमुद्रापारही क्रेझ कायम, एकूण कमाई किती
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरातल्या कमाईमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत तब्बल १४०.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.