(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संघटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, हा त्याच्या इतिहासातील एक मोठा टप्पा आहे.
शंभर वर्षांचा हा प्रवास पूर्ण करत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेली संघटना राहिली आहे. संघाविषयीची सार्वजनिक मते अनेकदा सखोल समजुतीपेक्षा धारणांवर आणि समजुतींवर आधारित राहिली आहेत. त्याच्या मूळ तत्त्वज्ञान, मूल्यव्यवस्था आणि अंतर्गत कार्यपद्धतीकडे पाहाण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाही.
‘शतक (संघ के १०० वर्ष)’ या शीर्षकाचा हिंदी चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा सखोल आणि वास्तवदर्शी मागोवा घेणारा ठरणार आहे. वीर कपूर निर्मित आणि आशिष तिवारी सहनिर्मित असलेला हा चित्रपट एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे. गोंगाट, मतभेद आणि गैरसमजांच्या पलीकडे जाऊन संघाचा खरा, प्रामाणिक आणि ऐतिहासिक प्रवास मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
O Romeo Teaser: हातात गजरा, कानात बाळी; मासी-क्लासी लूकमध्ये दिसला रोमियो, टीझर बघून विसरून जाल कबीर सिंग
चित्रपटाबाबत निर्माता वीर कपूर म्हणतात, ‘’मी नेहमीच या राष्ट्राची सेवा केली आहे आणि त्याच माध्यमातून शक्य त्या प्रत्येक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही सेवा केली आहे. ‘शतक’ हा शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या, शांत तरीही अथक परिश्रमांनी उभ्या राहिलेल्या प्रवासातील एक नम्र पाऊल आहे. आज जग भारताकडे प्रेरणेसाठी पाहात असताना, गैरसमज आणि धारणांपलीकडे जाऊन ही कथा प्रामाणिकपणे मांडणे आणि देश घडवण्यात संघाची भूमिका अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे. स्पष्टता, एकता आणि राष्ट्रीय अभिमान या व्यापक ध्येयासाठी हा चित्रपट आमचे छोटेसे योगदान आहे.” आशिष मल दिग्दर्शित ‘शतक’ हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






