अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, ज्या होळी पार्टीत हजेरी लावल्यानंतर सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं, त्या फार्म हाऊसच्या मालकावर त्याच्याच पत्नीने आरोप केले होते. फार्म हाऊसचा मालक विकास मालूने (Vikas Malu) सतीश कौशिक यांचा खून केल्याचा आरोप सान्वी मालू (Sanvi Malu)यांनी केला होता.
विकासने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते. कोरोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकास यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकास यांनी मला सांगितलं होतं, असा दावा सान्वीने केला. विकासनेच सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप सान्वीने केला होता. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी सान्वीला नोटीस पाठवली आहे.
दिल्ली पोलीस सध्या अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी हिला पुन्हा चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सान्वीला चौकशीसाठी बोलावले आहे.
याआधी सान्वी मालूने पती विकासवर बलात्काराचे आरोप केले आहेत. मी आधी विकास मालूविरोधात तक्रार दिली होती. विकासने लग्नाआधी माझ्यावर बलात्कार केला. पुढे मग बळजबरीने माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्याचा मुलगाही माझा बलात्कार करू लागला. मला हे सगळं सहन होत नव्हतं, त्यामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये मी त्याचं घर सोडलं, असं सान्वी मालूने सांगितलं.
दरम्यान, विकास मालू आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा दोघांनीही सान्वीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. सान्वी व विकास यांच्या एकमेकांवरील तक्रारी पोलिसांनी नोंदवून घेतल्या आहेत. पण या प्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. आता या प्रकरणात नक्की काय बाहेर येणार हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.