kedar shinde shared post hindi language compulsory from 1st standard
राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्रीकरणाच्या अनुषंगाने घेतलेल्या पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. इतक्या लहान मुलांवर तीन- तीन भाषा शिकण्याची सक्ती का ? असा सवाल राज्य सरकारला सध्या राज्यातली जनता, विरोधी पक्षातले नेते शिवाय कलाकार मंडळीही विचारताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकार मंडळी सरकाराच्या या धोरणाविरोधात आहेत. अशातच मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरुन खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गुढ उकललं? डॉक्टरांनी सांगितलं कारण
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. “ठेच लागल्यावर ‘आई गं’ म्हणायचं की ‘ओ मेरी माँ….’ यात पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्युज करू नका… त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “हिंदी सक्ती नकोच, जय महाराष्ट्र” असं कॅप्शन त्यांनी या शेअर केलेल्या व्हिडिओला दिलेलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, केदार शिंदेंसोबतच मकरंद अनासपुरे, हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, किरण माने या कलाकारांनी त्यांच्या भूमिका मांडत पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयाला सुरुवातीपासूनच मनसेसोबतच शिवसेना- ठाकरे गट आधीपासूनच आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी २६ जून रोजी पत्रकार परिषद घेत हिंदीसक्ती विरोधात मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. या मोर्च्यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून लोकं येणार आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.