(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sam Neill Died: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘ज्युरॅसिक पार्क’मधील डॉ. अॅलन ग्रँट यांच्या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेले न्यूझीलंडचे ज्येष्ठ अभिनेते सॅम नील यांचं वयाच्या ७८व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
सॅम नील यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. सोमवारी (१३ जुलै) ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या क्षणी कुटुंबीय त्यांच्या सोबत होते. कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाला “अचानक आणि अनपेक्षित” असल्याचं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, २०२२ मध्ये सॅम नील यांना स्टेज-३ रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र, उपचारांनंतर यावर्षी एप्रिलमध्ये ते कर्करोगमुक्त झाल्याची माहिती समोर आली होती. कुटुंबीयांनीही त्यांच्या निवेदनात ते कर्करोगमुक्त असल्याचं स्पष्ट करत सिडनीतील सेंट व्हिन्सेंट प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
निवेदनात म्हटलं आहे, “अत्यंत दुःखाने आम्ही सॅम नील यांच्या निधनाची बातमी देत आहोत. त्यांनी आयुष्यभर ज्या सन्मानाने आणि धैर्याने जीवन जगलं, त्याच शांततेने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”
View this post on Instagram
सॅम नील यांनी १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Sleeping Dogs’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, १९९३ मध्ये स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘Jurassic Park’ या चित्रपटातील डॉ. अॅलन ग्रँट यांच्या भूमिकेमुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘Jurassic Park III’ (2001) आणि ‘Jurassic World: Dominion’ (2022) या चित्रपटांमध्येही हीच भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
सॅम नील यांनी आपल्या चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला असून, जगभरातील चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.






