(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Payal Rohatgi Exclusive Interview: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीने नुकत्याच ‘नवराष्ट्र’ला दिलेल्या खास मुलाखतीत अभिनय, संगीत आणि तिच्या भविष्यातील योजना याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. उत्तम अभिनेत्री होण्यासाठी केवळ भावना व्यक्त करणं पुरेसं नसून, आवाजातील चढ-उतार अर्थात व्हॉईस मॉड्युलेशनही तितकंच महत्त्वाचं असल्याचं तिने यावेळी सांगितलं.
अभिनयानंतर संगीताची आवड कशी निर्माण झाली? यावर पायल म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. आता मला काहीतरी नवीन शिकायचं होतं. माझ्या चित्रपटांमधील गाणी श्रेया घोषाल, कैलाश खेर यांसारख्या गायकांनी गायली होती. त्यामुळे मला गाणं शिकण्याची गरज कधी वाटली नाही. त्या काळात मी अभिनय आणि डान्सवरच अधिक लक्ष दिलं.”
संगीत शिकण्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, “आता मला आशयघन आणि महिलाप्रधान भूमिका करायच्या आहेत. अभिनयात केवळ भावना पुरेशा नसतात, तर आवाजातील चढ-उतारही तितकेच महत्त्वाचे असतात. इमोशन्ससोबत योग्य व्हॉईस मॉड्युलेशन असेल, तर तुम्ही अधिक प्रभावी अभिनेत्री बनू शकता. म्हणूनच मी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला.”
View this post on Instagram
पायल सध्या गायक कैलाश खेर यांच्या अकॅडमीत संगीताचे धडे घेत आहे. याबद्दल ती म्हणाली, कैलास खेर यांची अकॅडमी माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. म्हणून मी ही अकॅडमी निवडली. कैलासजींसोबत माझे जुने नाते आहे, कारण माझे पहिले आयटम साँग (‘ओ सिकंदर’ – चित्रपट: कॉर्पोरेट) त्यांनीच गायले होते. अकॅडमीमध्ये पहिल्या दिवशी माझी आवाजाची चाचणी झाली. मी तिथे हनुमान चालीसा गायली, कारण मी ती रोज वाचते आणि मला तेच नीट गाता येत होते
सध्या ती सारेगम, अलंकार, पलटे आणि राग यांचे प्राथमिक धडे शिकत आहे. याशिवाय आवाज अधिक मृदू आणि प्रभावी करण्यासाठी ती स्वतंत्रपणे सरावही करत आहे. “गायक होण्यासाठी आवाजाची काळजी घेणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे मी फोनवर कमी बोलते आणि शक्य तितका व्हॉट्सॲपचा वापर करते,” असंही तिने सांगितलं.
भविष्यात व्यावसायिक गायिका होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर पायल म्हणाली, “अभिनयासोबत गायनाची संधी मिळाली तर मला नक्की आवडेल. सध्या मी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी गात सराव करत आहे. संगीतामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल झाला असून, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. संगीताने माझ्या आयुष्यात शांतता आणि गोडवा आणला आहे.”






