patrapatri the 50th show of marathi drama will be soon
सध्या आयपीएलचा १८ वा सीझन सुरू आहे. २२ मार्चपासून या सीझनला सुरुवात झाली असून नाट्यप्रेमींसाठी आणि क्रिकेटरसिकांसाठी एक खास बातमी आहे. मराठी रंगभूमीवरील एक आगळेवेगळे आणि मनाला भिडणारे नाटक म्हणजे ‘पत्रापत्री’…. येत्या काही दिवसांत हे ‘पत्रापत्री’ नाटक आपला सुवर्ण सोहळा साजरा करत आहे! ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वा. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या नाटकाचा ५०वा प्रयोग सादर होणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे. या नाटकाच्या ५० व्या प्रयोगावेळी नाट्यप्रेमींसाठी आणि क्रिकेटरसिकांसाठी एक खास मेजवानी असणार आहे.
‘पत्रापत्री’नाटकाचा पहिला प्रयोग १७ मे २०२४ रोजी मुंबईच्या एनसीपीए येथे प्रतिष्ठित ‘प्रतिबिंब मराठी थिएटर फेस्टिव्हल’अंतर्गत सादर करण्यात आला. तेव्हापासून ते आजवर या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. विशेषतः अमेरिकेतील १६ प्रयोगांच्या अत्यंत यशस्वी दौऱ्यानंतर, या नाटकाने आपले जागतिक महत्त्वही अधोरेखित केले आहे. हे नाटक सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘पत्रापत्री’ या पुस्तकावर आधारित आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रकाशित झाले होते. दोन वृद्ध मित्र, तात्यासाहेब आणि माधवराव, यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित हे नाटक, हास्य, नॉस्टॅल्जिया आणि मार्मिक सामाजिक निरीक्षणांनी भरलेले आहे. डिजिटल युगात हरवू पाहणाऱ्या हस्तलिखित पत्रांच्या जादूचा अनुभव प्रेक्षकांना देण्याचा या नाटकाचा प्रयत्न आहे.
नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगात केवळ पाच पत्र सादर केली जातात आणि ती दरवेळी बदलत राहतात. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात नवीन अनुभव मिळतो. सध्या नाटकात असलेले एक पत्र इंडियन प्रीमियर लीग (IPL) वर विनोदी भाष्य करणारं असणार आहे. क्रिकेटच्या या आकर्षक स्वरुपावर दोन वृद्ध मित्रांचे वेगवेगळे दृष्टिकोन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले जाणार आहेत आणि मुख्य बाब म्हणजे हेच विशेष आकर्षण नाटकाच्या ५० व्या प्रयोगाचं असणार आहे. ‘पत्रापत्री’नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले आहे. तर दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांच्या अफलातून अभिनयामुळे हे नाटक विशेष प्रभावी ठरत आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने, संवाद कौशल्याने आणि साध्या, पण प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवते आहे.
‘नशा करो तो इन आँखो का, शराब मे क्या रखा है…’ समंथाच्या फक्त नजरेने तरुण घायाळ; नवा लुक पाहिलात का?
महाराष्ट्रभर आणि परदेशातही प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे हे नाटक ५० व्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. या नाटकाने मैत्री, आठवणी आणि समाजजीवनावर मार्मिक भाष्य करताना हास्य आणि भावनिक ओलावा यांचा उत्तम संगम घडवला आहे. हा सुवर्ण प्रयोग म्हणजे या नाटकाच्या लोकप्रियतेचा आणि कलात्मक उंचीचा एक उत्तम पुरावा आहे. या नाटकाचे लेखन व नाट्यरूपांतर नीरज शिरवईकर यांनी केले असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. प्रमुख भूमिका दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांनी साकारली असून, संगीत संयोजन अजित परब यांनी केले आहे. नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी तर प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या निर्मितीमध्ये माधुरी गवांदे आणि निनाद कर्पे यांचा मोलाचा वाटा असून, हे नाटक ‘बदाम राजा प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली सादर होत आहे.
या ५०व्या प्रयोगासाठी नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. या अविस्मरणीय संध्याकाळी, हास्य आणि भावनांच्या सुरेख संगमाचा आनंद घ्या आणि पत्रसंवादाच्या जुन्या जमान्याची आठवण अनुभवायला या!