अभिनेता निखिल दामलेने शेअर केला 'कमळी'चा अनुभव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मालिकांमध्ये हल्ली वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत आणि सध्या कमी वेळात चांगला टीआरपी मिळवत असलेली एक मालिका म्हणजे ‘कमळी’. कमळीमधील हृषीची भूमिका साकारत असलेला अभिनेता निखिल दामले सध्या तरूणींच्या गळ्यातील ताईत होताना दिसून येत आहे. कमी वयाचा तरणाबांड आणि हँडसम असा प्रोफेसर असणारा हृषी सध्याच्या Gen Z ला चांगलाच भावतोय.
निखिल दामलेने साकारलेली ही भूमिका सध्या गाजतेय आणि निखिलला ही भूमिका नक्की कशी मिळाली, त्याने या भूमिकेसाठी काही खास अभ्यास केलाय का? कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी त्याने काय मेहनत घेतली याबाबत निखिलने ‘नवराष्ट्र’शी खास बातचीत केली आहे. तुम्हीही आपल्या लाडक्या हृषीबाबत नक्कीच जाणून घ्यायला उत्सुक आहात ना? चला तर मग सुरू करू. सर्वात पहिल्यांदा आम्ही निखिलला ही भूमिका नक्की कशी मिळाली असे विचारले.
निखिलला ही भूमिका नक्की कशी मिळाली?
निखिल खरं तर सध्या खूपच खुष आहे. या भूमिकेबाबत निखिलने अगदी मनोरंजक गोष्ट सांगितली. त्याने हृषीच्या भूमिकेसाठी जेव्हा ऑडिशन दिली होती, त्यानंतर साधारण १ महिना त्याला याबाबत काहीच कळले नव्हते, तेव्हा निखिलला ‘ही भूमिका आपल्या हातातून गेली आहे’ असंच वाटलं होतं. मात्र ही भूमिका महिन्याभराच्या गॅपनंतर त्याच्या हाती लागली आणि त्यानंतर लुक टेस्ट, कॉस्च्युम टेस्ट झाल्यावर लगेचच काम सुरू झाले होते असं त्याने सांगितले.
या भूमिकेदरम्यान काही आव्हान जाणवले का?
निखिल म्हणाला, ‘प्रत्येक भूमिकेसाठी एक आव्हान असतेच. पण या भूमिकेसाठी आपल्यापेक्षा अगदीच २-३ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलांच्या प्रोफेसरचे काम करायचे होते आणि ते माझ्यासाठी आव्हानाचं होते, या भूमिकेसाठी तयारी म्हणजे आपण शाळेपासून आपले जे प्रोफेसर पाहतो, त्यांचं निरीक्षण अथवा काही चित्रपटातील शिक्षकांचं निरीक्षण मी केलं आणि नैसर्गिक पद्धतीने ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रेक्षकांना ते आवडतंय याहून अधिक पोचपावती तरी काय असणार’, असेही निखिलने आवर्जून सांगितले.
‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार
कबड्डी कोचसाठी काय मेहनत घेतली?
निखिलने अगदी प्रामाणिकपणे सांगितले की, ‘खरं तर आजपर्यंत मी कधीच कबड्डी खेळलो नाही आणि अगदी १-२ मॅचच कबड्डी प्रो च्या पाहिल्या होत्या. पण आता कमळी मालिकेचा ट्रॅकच संपूर्ण कबड्डी खेळावर आहे. त्यामुळे बेसिक माहिती गोळा केली आणि अगदी खरं सांगायचं तर गुगलवर जाऊन कबड्डीचे नियम काय आहेत हेदेखील वाचले आहे. याशिवाय आता कोचची भूमिका करायची तर खेळाचे नियम आणि डावपेच माहीत असायला हवेत आणि त्यासाठी सध्या गुगललाच गुरू करून घेतले आहे, कारण मॅच बघायला फारच कमी वेळ मिळतो. पण अभ्यास करूनच काम करणे महत्त्वाचे असल्याने भूमिकेसाठी संपूर्ण बेसिक माहितीचा नक्कीच अभ्यास केलाय’
थिएटर आणि मालिकांमध्ये काय फरक वाटतो?
निखिलचे मूळ हे थिएटर आहे आणि त्याने अनेक मालिकांमध्येही कामं केली आहेत. त्यामुळे या दोन्हीमध्ये काम करताना नक्की काय फरक जाणवतो हेदेखील त्याने अगदी सविस्तर सांगितले.
निखिलच्या म्हणण्याप्रमाणे नाटकात अगदी शेवटच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रेक्षकापर्यंत आपला आवाज आणि अभिनय पोहचवावा लागतो त्यामुळे ते बरेचदा लाऊड असते पण मालिकांमध्ये तसे काम करून चालत नाही. दोन्हीकडे काम करताना वेगवेगळी आव्हानं असतात आणि त्यानुसारच काम करावे लागते. मला दोन्ही ठिकाणी काम करताना समाधान मिळतं, असंही निखिल म्हणाला.
आजपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य
निखिलने आतापर्यंत मराठीत बरेच काम केले आहे आणि त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत वैविध्य दिसून आले आहे. निखिल याबाबत म्हणाला की, ‘मी अत्यंत नशीबवान आहे की, मला खूप वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत करायला मिळाल्या. अगदी १२ वी करिअर करणारा मुलगा असो, ऑस्ट्रेलियातून आलेला असो वा पंडितांचा मुलगा असो आणि आता श्रीमंत घराण्यातील हृषी असो या सगळ्यातून एक वेगळा अनुभव घेता आला. विविध गोष्टी शिकता आल्या’ यामुळेच कोणत्याही भूमिकेत तोचतोचपणा आलेला नाही असंही निखिलने सांगितले.
वीकेंड नंतरही ‘दशावतार’ची कोट्यावधींची घोडदौड सुरूच!
बिग बॉसचा अनुभव कमाल
बिग बॉसमध्येही निखिलने सहभाग घेतला होता आणि निखिलच्या मते ‘Once in a Lifetime’ असा हा अनुभव असतो. अगदी पैसे देऊनही असा अनुभव घेता येणार नाही असं निखिलचं म्हणणं आहे. अभिनय करणे हा अभिनेता म्हणून आपला हातखंडा असतो पण अशा ठिकाणी जाऊन राहणं आणि तिथे अशा खेळात टिकून राहणं हा जगावेगळा अनुभव असतो. तसंच १००% आपण मनापासून योग्य खेळण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगायला निखिल विसरला नाही.
सध्या निखिल ‘कमळी’ मालिकेत व्यस्त असून कबड्डीचा ट्रॅक प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे आणि त्याला भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. निखिलचा हा अंदाज प्रेक्षकांनाही आवडताना दिसून येत आहे आणि म्हणूनच अगदी सोशल मीडियावरही त्याचे फॉलोअर्स वाढताना आपण पाहतोय. कमळीतील त्याची ही भूमिका आता नक्की कशी खुलत जाणार हे पहायला त्याचे चाहते उत्सुक आहेत हे मात्र नक्की!