किरण गायकवाड- वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, ‘लागिरं झालं जी’च्या टीमने कपलला दिल्या हटक्या पद्धतीने लग्नाच्या शुभेच्छा
‘झी मराठी’वरील गाजलेल्या ‘लागिरं झालं जी’ मालिकेत खलनायकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेला भैय्यासाहेब अर्थातच अभिनेता किरण गायकवाड लग्नबंधनात अडकला आहे. किरणने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधली. किरण आणि वैष्णवी लग्नबंधनात अडकल्यानंतर अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
“हे तर देशाचे हनुमान…” अभिनेता वरुण धवन गृहमंत्री अमित शाह यांना असं का म्हणाला ?
किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला ‘लागिरं झालं जी’मालिकेतील कलाकार उपस्थित होते. अभिनेता अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे यांनी खास हजेरी लावली होती. लग्नानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या ‘लागिरं’मय शुभेच्छा…” पुढे लिहिलंय, “झी मराठी प्रसन्न, आमच्या येथे झी मराठीच्या कृपेने देवमाणसाच्या आशीर्वादाने, किरण आणि वैष्णवी यांना प्रेमाचे ‘लागीर झालं जी…’ ना शितली… ना जयडी… वैष्णवी होणार, भैय्यासाहेबाची बायडी… शुभेच्छूक लागिर बॉइज, चांदवडी.”
शिवाय, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक महेश मांजरेकर यांनीही किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला घरीही येण्याचे आमंत्रण दिलेय. तर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, “किरण भावा तुला आणि वैष्णवीला येल्लो येल्लो शुभेच्छा! मस्त रहा, खुश रहा! खूप खूप प्रेम!” १४ डिसेंबरला म्हणजेच काल किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या कपलचा वैष्णवी कल्याणकरच्या गावी म्हणजेच, मालवणात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. किरण गायकवाड आता सावंतवाडीचा जावई झाला आहे.
लग्नाच्यावेळी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपारिक लूक कॅरी केला होता. किरणने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता. तर वैष्णवीने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. लूकला साजेसे मोजके दागिने परिधान केले होते. त्यामुळे दोघं फारच सुंदर दिसत होते. दरम्यान, किरण गायकवाडने २९ नोव्हेंबरला वैष्णवीबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कुबली दिली होती.






