actress archana nevrekar visit sangameshwar where sambhaji maharaj was imprisoned by aurangzeb
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’चित्रपटाची अजूनही जोरदार चर्चा सुरु आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४ फेब्रुवारीला रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सव्वा महिन्यात देशात ५७४.९५ कोटींची कमाई केली आहे तर, जगभरात ७६३. ४६ कोटींची कमाई केलेली आहे. संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा हा चित्रपट सध्या कमालीचा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
दरम्यान, ‘छावा’चित्रपटामध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांवर क्रूर पद्धतीने केलेले अत्याचार पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने भेट दिली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री अर्चना नेवरेकरने तिच्या कुटुंबीयांसोबत संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला भेट दिली. संभाजी महाराजांना ज्या वाड्यात कैद करण्यात आलं होतं, हे ते ठिकाण आहे. त्या ठिकाणाला अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासोबत भेट दिली. भेट दिल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.
“संगमेश्वर कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले… ही वास्तू नेमकी काय आहे आणि ती वास्तू पाहून मन खिन्न झाले. चांगले नाही वाटले. कदाचित म्हणूनच त्या वास्तूमध्ये खूपच भयाण सत्य लपलेलं आहे. तो वाडा दुःखी दिसतो. मी माझ्या मुलासोबत अश्या बऱ्याच ठिकाणी जात असते जिथे आपला इतिहास,आपली संस्कृती त्याला समजली पाहिजे… प्रत्येक आई जिजाबाई नाही होऊ शकत .प्रत्येक घरात शिवाजी नाही जन्म घेऊ शकत. पण प्रत्येक घरात जिजाई चे संस्कार आणि हिंदुत्व विषयी प्रेम प्रत्येक आई देऊच शकते… एक चांगला माणूस चांगला नागरिक आणि चांगला भारतीय घरातूनच घडतो आणि घडवला पाहिजे… त्या साठी पैशाची नाही तर मनाची तयारी लागते… मी माझ्या मुलाला नेहमी एकच गोष्ट शिकवते चांगला माणूस हो… आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण छान जग… “, असं अर्चना नेवरेकर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते आहे.