(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरलेली गोष्ट म्हणजे ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने थिएटरमध्ये तब्बल ५० दिवस पूर्ण केले आहेत. आजच्या OTT आणि जलद बदलणाऱ्या मनोरंजनाच्या युगात, एखादा मराठी चित्रपट चित्रपटगृहात इतके दिवस टिकणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. मात्र, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेमामुळे या चित्रपटाने हे यश संपादन केले आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट गावातल्या तरुणांची न होणारी लग्नं — हा समाजात दिवसेंदिवस गंभीर होत जाणारा विषय घेऊन येतो. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारी कथा, कोकणचं नैसर्गिक सौंदर्य, तिथली माणसं आणि त्यांच्या अस्सल जगण्याचं दर्शन हे सर्व या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं.
मराठी चित्रपटांना पुरेशी थेटर्स आणि प्राईम टाईम न मिळणे या सर्व त्रासातून “कुर्ला टू वेंगुर्ला” जात असला तरी केवळ प्रेक्षकांच्या पसंतीमुळे हा चित्रपट मुव्ही टाईम हब मॉल, गोरेगाव येथे संध्याकाळी 7.30 वाजता अजूनही दाखवला जातो आहे. नुकताच या चित्रपटाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केल्याबद्दल सिने कथा कीर्तन आणि ऑरा प्रोडक्शन या चित्रपटाच्या निर्मिती संस्थांनी मान्यवर कलाकारांसाठी एक स्पेशल शो आयोजित केला होता. अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेते भारत गणेशपुरे, विजय पाटकर यांसारखे नामवंत कलाकार तसेच आत्मपॅंपलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे, व्हेंटिलेटर चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे “कुर्ला टू वेंगुर्ला” च्या खास शोसाठी उपस्थित होते. चित्रपटाला उपस्थित सर्व कलाकारांनी चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले.
लोकचळवळीतून निर्माण झालेला कुर्ला टू वेंगुर्ला हा अतिशय दर्जेदार सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा अशी जाहीर इच्छा आणि आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केले आणि तिच्या सोशल मीडिया वरती तसे प्रेक्षकांना आवाहन सुद्धा केले. कोणत्याही मोठ्या पाठिंब्याशिवाय “कुर्ला टू वेंगुर्ला” थिएटरमध्ये ५० दिवस टिकून राहतो हे खरंच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केल्याची पोचपावती आहे.
प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर, वैभव मांगले, सुनील तावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचे लेखन अमरजीत आमले तसेच दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे. चित्रपटाचे वितरण पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि हृषीकेश भिरंगी यांनी केले आहे.
ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला अडचणीत; नेमकं प्रकरण काय?






