(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मोठे वळण येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील जीवा- नंदिनी आणि पार्थ- काव्या या जोड्या प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत नेहमी नवनवीन वळणं येतात. सुरुवातीला या दोन जोड्यांची लग्नं त्यांच्या इच्छेविरुद्ध झाली होती, पण नंतर ते एकमेकांना आवडू लागले आणि आता त्यांच्यात जवळीक दिसते आहे.
काव्या आणि जीवाला एकमेकांशी लग्न करायचे होते, पण परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या भाऊ आणि बहिणीशी लग्न करावे लागले. जरी मनाविरुद्ध लग्न झाले असले, तरी काव्याला पार्थ आणि जीवाला नंदिनी चांगले जोडीदार मिळाले. नंदिनी जीवाला, तर पार्थ काव्याला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी काहीतरी करत असतात. आता काव्यालाही पार्थबद्दल आदर वाटू लागला असून, त्यांच्यात छान मैत्री दिसते. दुसरीकडे नंदिनी जीवाच्या प्रेमात असून, प्रोमोमध्ये ती आता त्याच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करणार असल्याचे दिसते.
पार्थला काव्यावर प्रेम आहे, पण काव्याला पार्थला तिच्या भूतकाळाबद्दल काही सांगितलेले नाही याची खंत आहे. तसेच जीवाने अजून नंदिनीला आपली प्रेयसी काव्याच होती, हे सांगितलेले नाही. आता मात्र मालिकेत मोठा खुलासा होणार आहे. ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर नवीन प्रोमो शेअर करत त्याला ‘सर्वांत मोठा खुलासा फक्त १० दिवसात’ असे कॅप्शन दिले आहे.
स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये प्रेमाचे सात रंग उलगडत असल्याचे दिसते. त्यात नंदिनी म्हणते, “१६ डिसेंबरला मी जीवाला आय लव्ह यू म्हणणार आहे.” काव्या म्हणते, “१६ डिसेंबरलाच मी पार्थला माझा भूतकाळ सांगणार आहे.” तर रम्या म्हणते, “१६ डिसेंबरला संपूर्ण देशमुख कुटुंबाला वेड लागणार,” आणि मोठमोठ्या हसण्यासह दिसते. यावेळी तिच्या हातात मंगळसूत्रही आहे. मालिकेत पुढे नेमके काय घडणार ये येणाऱ्या भागातच कळेल.






