(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ आणि ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या दोन्ही लोकप्रिय मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत नुकतीच मुजुमदारांची दिवाळी उत्साहात पार पडली. एकीकडे सावी धैर्यच्या प्रेमात अखंड बुडलेली असताना धैर्य मात्र सावीला फसवत आहे. मध्यंतरी सावीला याबद्दल पुरावेही सापडले होते परंतु धैर्यने चतुराईने ते पुरावे खोटे असल्याचं सांगितले. धैर्यच्या प्रेमापोटी सावीने त्याच्यावर विश्वासही ठेवला. इकडे धैर्य मात्र सावीविरुद्ध नवा कट रचत असतो.
आता मालिका एका रंजक वळणावर आली आहे. धैर्यचा खरा चेहरा सावी समोर आणण्यासाठी धैर्यचे भाऊ म्हणजेच विलास व भास्कर एक नवा डाव रचतात. विलास व भास्कर सावीसमोर धैर्य- इराचं नातं उघडकीस आणतात. याचसह धैर्यने हे लग्न सहा महिन्यांच्या करारावर केलं असल्याचे पेपर्स सावीच्या हाती लागतात. आता सावी समोर येणार का धैर्यचा खरा चेहरा? धैर्य हे पुरावे खोटे असल्याचं सिद्ध करू शकेल का? धैर्य- सावीच्या नात्याचं पुढे काय होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
याबरोबरच ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंस केलं. नुकतंच या मालिकेचे १०० भाग पूर्ण होताच सेटवर जंगी सेलिब्रेशन पार पडलं. ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत तेजा वैदहीसाठी स्वकमाईने पाडव्याचं गिफ्ट घेण्यासाठी धडपड करत असतो. परिसरात माईसाहेबांचा दबदबा असल्याने तेजाला कुणी काम देत नाही तर कोणी केलेल्या कामाचे पैसे देत नाही.
अशातच गावच्या जत्रेत एक अनोखी स्पर्धा रंगणार असल्याचं तेजाला कळतं. स्वतःच्या अंगाला आग लावून पाण्यात जो कुणी उडी मारेल त्या व्यक्तीला ५० हजार रोख रक्कम देण्यात येईल. वैदहीसाठी तेजा हा स्टंट करण्याचा ठरवतो. वैदहीच्या प्रेमासाठी तेजा देणार का अनोखी परीक्षा? तेजाचा हा स्टंट पाहून वैदही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.






