(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केली आहे. या मालिकेत दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात सध्या जरी थोडासा कडवटपणा दिसत असला, तरी हे नातं अधिक घट्ट आणि गोड करण्यासाठी दुष्यंत मनापासून प्रयत्न करताना दिसणार आहे.
कृष्णा ही शेतकरी असून शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेते, तर दुष्यंत या दोघांच्या विचारांमध्ये भिन्नता ठेवतो. दुष्यंतला खेडेगाव, शेती आणि मातीबद्दल काहीशी तिटकारा आहे. या दोघांमधील विचारांचा संघर्ष प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. मात्र हळूहळू कृष्णाच्या प्रेमामुळे आणि समजूतदारपणामुळे दुष्यंतचं मत बदलताना दिसत आहे. याआधी दुष्यंताने कृष्णाची मनधरणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण आता तो एक पाऊल पुढे टाकत कृष्णासोबत शेती करण्यासाठी सज्ज झालाय.मातीशी प्रत्यक्ष नातं जोडण्याचा हा प्रवास दुष्यंतच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे. प्रेक्षकांसाठी ही नवी कहाणी प्रेम, समजूतदारपणा आणि शेतकरी जीवनाची खरी झलक पाहण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.
Yuzvendra Chahal: चहलच्या आयुष्यात पुन्हा वादळ? आरजे महवशसोबतची मैत्री संपली? एकमेकांना केलं ‘अनफॉलो’; नेमकं प्रकरण काय?
या खास प्रसंगाबद्दल दुष्यंतची भूमिका साकारणारे अभिनेता अभिषेक रहाळकर म्हणाला,’ दुष्यंतच्या मनात मातीबद्दल जी भीती होती, ती कृष्णामुळे हळूहळू दूर होत आहे. त्याची मातीशी नाळ जोडली जात आहे. कृष्णाची मनधरणी करण्यासाठी आता तो शेतात तिच्यासोबत काम करणार आहे. कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यातले खूप छान क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. मला शेतकऱ्यांबद्दल अतिशय आदर आहे. आपली भूक भागवण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत असतात. एक अभिनेता म्हणून मी स्वतःला नशिबवान समजतो की मालिकेच्या निमित्ताने का होईना, मला शेतकऱ्यांचं आयुष्य अनुभवायला मिळत आहे. तेव्हा दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यातील हा भावनिक वळण अनुभवायला विसरू नका.






