(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. रुपेरी पडद्यावर खाष्ट सासू किंवा खलनायकी व्यक्तिरेखा साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला होता.
११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना लहानपणापासूनच संगीत आणि अभिनय याची आवड होती. त्यांनी शालेय जीवनातच शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांची आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता.
१९९० नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रातून दूर राहणे पसंत केले. मराठी चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानाची नोंद कायम राहील. त्यांच्या निधनाची माहिती चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक हृदयस्पर्शी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुपेरी पडद्यावर ‘खाष्ट सासू’ आणि नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या दया डोंगरे यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या गाजलेल्या कामांमध्ये ‘चार दिवस सासूचे’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी चित्रपटांचा तसेच ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. अभिनयाव्यतिरिक्त दया डोंगरे यांना गायनाचीही विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि मूळतः त्यांना गायन क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न होतं. त्यांच्या आई यमुताई मोडक या अभिनेत्री तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान, बहुप्रतिभावान आणि समर्पित कलाकार गमावला आहे.






