लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एंट्री
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ गेली दोन वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नाट्य, भावनिक क्षण, कौटुंबिक नाती आणि मनाला भिडणाऱ्या कथा यामुळे या मालिकेने घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
आता या मालिकेत एक नवा अध्याय सुरू होण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कथेत एका महत्त्वपूर्ण वळणावर सुकन्या पाटील या नवीन पात्राची दमदार एण्ट्री होत आहे. सुकन्या पाटील जी व्यवसायाने नर्स, स्वभावाने शांत, संवेदनशील आणि स्वतःच्या मनात असंख्य रहस्ये दडवून ठेवणारी तरुण मुलगी. लोकांची सेवा करण्याची तिची भावना इतकी प्रबळ आहे की, याच कारणामुळे तिने नर्सिंग हे क्षेत्र निवडले. रुग्णांची सेवा करण्यातून लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहून तिला जीवनाची खरी किंमत जाणवते. सुकन्या बाहेरून जितकी मृदू, हसतमुख आणि सकारात्मक वाटते, तितकाच तिचा भूतकाळ मात्र वेदनांनी भरलेला आहे.
या प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर दिसणार असून, तब्बल चार वर्षांनंतर ती मालिकांच्या विश्वात एक भक्कम पुनरागमन करत आहे. नक्षत्राच्या पुनरागमनामुळे मालिकेत एक नवी ऊर्जा येणार असून प्रेक्षकांसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे.
भूमिकेबद्दल बोलताना नक्षत्रा म्हणाली, “माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेमुळे झाली आहे. त्यामुळे टीव्ही हे माझ्यासाठी लाडकं माध्यम आहे. पुन्हा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. सुकन्या पाटील या पात्राची माहिती ऐकताक्षणीच मला ते मनापासून भावलं. माझ्या आणि सुकन्याच्या स्वभावात बरीच साम्यस्थळे आहेत. ती अत्यंत सकारात्मक, देवावर प्रचंड विश्वास ठेवणारी मुलगी आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडतं चांगलं की वाईट. ते मीही देवावरच सोडते. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी, सदैव हसमुख असणारी सुकन्या बाहेरून कठोर नाही, पण तिच्या मनात अनेक वेदना दडलेल्या आहेत.”
ती पुढे म्हणते, “सुकन्याला वाटतं की आयुष्य भेट आहे, हक्क नाही. त्यामुळे ती प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगते. स्वतःच्या भूतकाळाबद्दल बोलण्यापेक्षा तिच्यासाठी आज ती काय करते हे अधिक महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांना सुकन्याचा भूतकाळ काय आहे, ती कथेत काय बदल घडवून आणते, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.”
लक्ष्मीच्या पाऊलांनी आता आणखी रोचक वळण घेणार असून, सुकन्याच्या येण्याने मालिकेची कथा कोणत्या नव्या दिशेने वळते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.






