(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
काही व्यक्ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवत जगतात. त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा तो ठसा पुसला जात नाही. उलट त्यांच्या पाऊलखुणा कायमच राहतात. आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घालत लोककलेचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांची एक प्रतिभावंत लोकशाहीर ही ओळख कधीही विसरली जाणार नाही. भारूड, गोंधळ, पोवाडे अशा विविध लोकधारेने रसिकांची मने चिंब भिजवणारे शाहीर विठ्ठल उमप मराठी जनमानसांसह देश-विदेशात नावाजले गेले. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा बुधवार २६ नोव्हेंबरला रवींद्र नाट्यमंदिर येथे सायं. ६.०० वा. संपन्न होणार आहे.
कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. यंदाच्या ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ गझलनवाझ श्री. भीमराव पांचाळे (जीवनगौरव), शाहीर श्री राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), श्री.प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते श्री. जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), श्री. परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व लोकशाहीर विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले सुरेख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले, ‘लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. बाबांनी जनसामान्यांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण केला. याच कारणाने रसिक प्रेक्षकांनी आम्हालाही आपलसं केलं. कलेशी असलेली ही बांधिलकी जपत समाजाप्रती आपले उत्तरदायित्व तसेच समाजसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध राहू असा विश्वास नंदेश उमप यांनी यावेळी व्यक्त केला’.
या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. उस्ताद शाहीद परवेझ खान (सतार) तसेच लावणी कलावंत रेशमा मुसळे परितेकर(पुणे) यांची संगीत बारी असा सादरीकरणाचा रंगारंग कार्यक्रम या सोहळ्यात रंगणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री मा.श्री.आशिष शेलार, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आय.ए एस.ऑफिसर डॉ. हर्षदीप कांबळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार श्री.अमितजी साटम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.विभीषण चवरे आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
लोककलेच्या सेवेसाठीआयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने २०१२ साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाऊंडेशनचे सामाजिक कार्य ही वाखाणण्याजोगे आहे. फाऊंडेशनतर्फे आजवर अनेक गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांपर्यंत तसेच शैक्षणिक ते सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक लोककलावंतांचा समावेश आहे. कोविड काळातही अनेक कलाकार, लोककलाकार, साहित्यिक यांना फाऊंडेशनतर्फे सहकार्याचा हात देण्यात आला. कलेसाठी झटत समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ विठ्ठल उमप फाऊंडेशने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून आजवर जपली आहे. वडिलांचा वारसा जपत त्यांचा मुलगा नंदेश उमप यांनी हा वारसा समर्थपणे सांभाळला आहे.






