(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रविवार २३ नोव्हेंबर रात्री ८.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली आहे. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही, त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.
रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूम मध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’. तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात. आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.’
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर, या नाटकाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि कलाकारांची ऊर्जा बघून त्यांनी ही एकांकिका दोन अंकी व्यावसायिक व्यावसायिक नाटकात रूपांतरित करायचं ठरवलं. या नाटकाचे दिग्दर्शन विनोद रत्ना यांनी केले आहे. तसेच या नाटकात श्रेयस जोशी, वैभव रांधवे, समृद्धी कुलकर्णी या नवोदित कलाकारांनी काम केले आहे. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना त्यांच्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे.
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे नाटक तरुण पिढीशी थेट संवाद साधणारं आहे. जेव्हा एखादा कलाकार त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त वयाची भूमिका करतो, तेव्हा ते कधी कधी जमून येत नाही. तसंच प्रत्येक वेळी ते प्रेक्षकांना आवडेल असंही नसतं; पण ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ मध्ये प्रत्येक कलाकार आपल्या वय आणि पिढीशी जुळणारी भूमिका निभावत आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवाशी जोडेल. त्याचबरोबर आजच्या जेन-जी पिढीला साजेसं असंही नाटक आहे.






