(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असून घरात रोज नवनवीन गोष्टी घडलेल्या पाहायला मिळत आहेत. घरात दररोज नवनवीन राडे पाहायला मिळत असले, तरी काही वेळेस सदस्य आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास आठवणी शेअर करताना भावूक होताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, करण घरातील इतर सदस्यांशी म्हणजेच दीपाली, आयुष आणि ओमकार यांच्याशी संवाद साधताना त्याच्या कुटुंबाबद्दल आणि संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसला.
आई-बाबांसाठी दुबईची सफर याबद्दल बोलताना दिसत आहे. करणने आपल्या आई-बाबांबद्दल बोलताना सांगितले की, त्याने अलीकडेच त्यांना दुबईची सफर घडवून आणली. त्याचे स्वप्न आहे की त्याने त्याच्या पालकांना जगातील प्रत्येक देश दाखवावा. दुबईमध्ये त्याने त्याच्या पालकांसाठी चक्क बुर्ज खलिफा मध्ये रूम बुक केली होती आणि त्यांना ‘स्काय डायव्हिंग’चे सरप्राईज दिले होते. ४० वर्ष बँकेत नोकरी करणाऱ्या आपल्या वडिलांसाठी हा अनुभव किती अविस्मरणीय होता, हे त्याने अभिमानाने सांगितले.
याचसोबत तो संघर्षाचे जुने दिवस आणि ‘Money can buy Happiness’ यावर बोलताना देखील दिसणार आहे. गप्पांच्या ओघात करणने त्याच्या बालपणातील कठीण प्रसंगांनाही उजाळा दिला. तो म्हणाला: “मी माझ्या वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करताना पाहिलं आहे. लोक घरी पैसे मागायला यायचे तेव्हा बाबांना लपावे लागायचे. तो काळ मी विसरू शकत नाही. म्हणूनच मला असं वाटतं की, माझ्या मुलाला जे हवं ते मी देऊ शकलो पाहिजे.” अनेकजण म्हणतात की ‘पैशाने आनंद विकत घेता येत नाही’, पण करणने या मताशी असहमती दर्शवली. तो स्पष्टपणे म्हणाला, “पैशाने नक्कीच आनंद विकत घेता येतो, फक्त तुम्हाला तो कुठे खर्च करायचा हे माहित असायला हवं.” त्याच्या या विधानाला घरातील इतर सदस्यांनीही दुजोरा दिला.
घरात नव्या संकटाची चाहूल?
एकीकडे करणच्या या भावनिक गोष्टी सुरू असतानाच, दुसरीकडे रुचिता जामदारसाठी ‘पॉवर की’चा वापर महाग पडताना दिसत आहे. करण आणि रुचिता यांच्यातील हा ‘पॉवर की’चा वाद घराला कोणत्या दिशेला नेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






