हातात बंदूक आणि नजरेत अंगार! शिवानी सुर्वेचा 'ऑपरेशन लंडन कॅफे’ चित्रपट 'या' तारखेला होणार रिलीज
गेल्या काही दिवसांपासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं भव्य पोस्टर प्रदर्शित झालं असून, हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक अॅक्शन-पॅक्ड रोमँटिक ड्रामा असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट होतं. चित्रपटाचं पोस्टर केवळ सिनेमाची भव्यता आणि उंची दर्शवत नाही, तर प्रेक्षकांच्या उत्सुकतेतही भर घालत आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड भाषेत केलं आहे. प्रमुख कलाकारांबरोबरच प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार आणि रुक्मिणी सुतार यांसारखे मराठी कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.
‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा एक एक्शन-रोमँटिक चित्रपट असून, त्यात थरार आणि प्रेमकहाणीचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी कन्नड कलाकारांनी मराठी भाषा शिकली आहे, तर मराठी कलाकारांनी कन्नड संवादांसाठी मेहनत घेतली आहे — हे या चित्रपटाचं अनोखं वैशिष्ट्य ठरतं.
कवीश आणि मेघा शेट्टी यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने साऊथ सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे, तर शिवानी सुर्वे हिचा ग्लॅमरस लुक आणि अभिनय महाराष्ट्राबरोबरच बाहेरही लोकप्रिय आहे. विराट मडके आणि अश्विनी चवरे यांच्या भूमिकांमुळे या चित्रपटात नव्या जोशाची भर पडली आहे.
या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ या बॅनरअंतर्गत केली आहे. छायाचित्रणाची जबाबदारी आर. डी. नागार्जुन यांनी सांभाळली आहे.
‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ रोजी जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.






