(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदी मधील ‘पवित्र रिश्ता’ ते ‘तू तिथे मी’ अशी लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रियाने अखेर या जगाचा निरोप घेतला आहे. प्रियाच्या अशा जाण्याने अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रिया मराठे यांची अत्यंत जवळची मैत्रीण प्रार्थना बेहेरेने तिचे दुःख व्यक्त केले आहे. काल अभिनेत्रीच्या अंत्यसंस्कार वेळी प्रार्थना खूप भावुक झाली होती. आणि आज तिने प्रिया मराठे यांच्या आठवणीत एक नोट शेअर केली आहे.
प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना भावुक
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मैत्रीणीच्या जाण्यावर आपले दुःख व्यक्त केले आहे. तिने प्रियासोबत घालवलेले सगळे क्षण, आठवणी आणि तिची कॅन्सरशी झुंज हे सगळं भावुक होऊन शेअर केले आहे. प्रार्थनाने प्रियाचे खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘ए वेडे प्रिया, ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे … आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्तास बोलत बसायचो… मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही.’
प्रार्थनाने पुढे मैत्रीणीबद्दल लिहिले की, ‘ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला, ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला.’ असे प्रार्थना म्हणाली.
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात गोंधळ, सोडले कुनिकाने कॅप्टनपद! नक्की झाले काय?
तसेच, प्रार्थनाने प्रिया कशी कॅन्सरशी झुंज देत होती हे देखील सांगितले आहे. ती म्हणाली, ‘कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती… तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, “तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.’
पुढे प्रार्थनाने लिहिले, ‘कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा.’ असे लिहून प्रार्थनाने आपल्या मनातील दुःख शेअर केले आहे.
मुलगी आराध्यासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहचली ऐश्वर्या; चाहत्यांना आवडला दोघींचा अंदाज!
प्रिया मराठे यांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, प्रियाने करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीतून केली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘चार दिवस सासूचे’ अशा मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. हिंदीतही तिने आपली ओळख निर्माण केली. ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ अशा मालिकांमध्ये तिच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.