(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पत्नी पल्लवी जोशी हे दोघेही सध्या चर्चेत आहे. कारण आहे त्यांनी मराठी जेवणावर केलेली खिल्ली. ‘मराठी लोकांचं जेवण म्हणजे गरीबांचं जेवण, शेतकऱ्यांचं जेवण’, असं वक्तव्य विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत केले आहे. त्यावर पल्लवी हसताना दिसली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांची संतापाची लाट उसळली. आणि अनेक मराठी कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
या वक्तव्यावर मराठी कलाकार एकामागून एक टीका करत आहेत. आधी दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेत्री नेहा शितोळे यांनी प्रतिक्रिया दिली. आता अभिनेता पुष्कर जोगही पुढे आला. त्यानेही स्वतःचा संताप व्यक्त केला. अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि विवेक अग्निहोत्रींवर चांगलीच टीका केली आहे.
पुष्कर जोगने व्यक्त केला संताप
पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेर करून लिहिले की, “सगळे महाराष्ट्रात येतात, छान काम करतात, पैसे कमावतात, पण मराठीला मान कोणी देत नाही. ह्याचं वाईट वाटतं. ह्यावर कोणाही बोलत नाही अजून 10-12 वर्षांनी मराठी माणूस शिल्लक राहील का, ही भीती वाटते. या कमेंटचा जाहीर निषेध. एवढी गरिबी आहे म्हणूनच अख्ख्या देशाचा भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचललाय…असो…”. असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
तसेच, आता विवेक–पल्लवी यांच्या या व्हिडीओवर नेटकरी जोरदार टीका करत आहेत. “मराठी जेवणाची टिंगल करून प्रसिद्धी मिळवायची ही पद्धत चुकीची आहे”, असं मत अनेकांनी मांडले आहे. तर, काहींनी पल्लवी जोशींना उद्देशून “तुम्ही स्वतः मराठी आहात, तरी मराठी संस्कृतीची थट्टा करता?” असा सवालही केला आहे.
काय म्हणाले विवेक अग्रिहोत्री?
वरणभाताबद्दल बोलताना विवेक अग्रिहोत्री म्हणाले, ‘माझ्यासाठी वरण भात हा एकदम कल्चरल शॉक होता, इतके साधे जेवण! मला वाटायचे हे गरिबांचे जेवण आहे, पण नंतर माझ्या लक्षात आले की, वरण भात हे अत्यंत पौष्टिस आणि साधे जेवण आहे’, यावर पत्नी पल्लवी जोशीने किस्सा सांगत म्हटले की, पहिल्यांदा वरणभात खाल्ल्यावर विवेकच्या चेहऱ्यावरील हावभाव हे अत्यंत विचित्र होते आणि त्याने यात मसाला कुठे आहे? असा प्रश्न विचारला होता. मात्र या सगळ्या गप्पांवर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.