(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारताच्या विविध भाषांमधील नव्या पिढीतील कथाकथनकारांना राष्ट्रीय व्यासपीठ देण्यासाठी ‘Z’ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस तर्फे ‘झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट’ या सर्वसमावेशक, उद्योगाची व्याख्या बदलणाऱ्या आणि देशव्यापी ओम्नीचॅनेल उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यापकतेवर आधारित भविष्यातील कॉन्टेन्ट इकोसिस्टम उभारण्याच्या वचनबद्धतेचा हा पुढचा टप्पा मानला जात आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश देशभरातील नवोदित चित्रपट निर्मिती प्रतिभेचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कलागुणांचा सन्मान करणे हा आहे. विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टींमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेले दिग्दर्शक एका राष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच एकत्र येत असून, ही स्पर्धा भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाकांक्षी बहुभाषिक टॅलेंट हंट उपक्रमांपैकी एक ठरत आहे.
या उपक्रमात हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा सात प्रमुख भाषांचा समावेश आहे. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि समृद्ध चित्रपट परंपरा असलेल्या कथाकथनकारांना उद्योगातील दिग्गजांच्या पाठिंब्यासह राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मंच उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा गाभा आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील धाडसी कथाकथनासाठी ओळखले जाणारे अनिराग कश्यप मराठीतील सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी चित्रपटांसाठी प्रसिद्ध रवी जाधव, बंगाली चित्रपटसृष्टीतील आशयघन दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी, भव्य कल्पनाशक्तीसाठी ओळखले जाणारे नाग अश्विन सामाजिक विषयांवर प्रभावी चित्रपट करणारे समुथिरकणी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेलेले मल्याळम दिग्दर्शक लिजो जोस पेलिसेरी आणि भावनिक व सूक्ष्म कथाकथनासाठी प्रसिद्ध हेमंत एम. राव या दिग्गजांचा परीक्षक म्हणून सहभाग आहे.
प्रथमच आपापल्या प्रादेशिक चित्रपट चळवळीचे नेतृत्व करणारे हे दिग्दर्शक एका मंचावर एकत्र आले असून नवोदित प्रतिभेला मार्गदर्शन आणि संधी देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विश्वासार्हता लाभतेच, तसेच भारतातील भाषिक आणि सर्जनशील विविधतेचे प्रतिबिंबही उमटते. डिजिटल युगात कथा विविध माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना, हा उपक्रम निर्मात्यांना केवळ एका फॉरमॅटपुरते मर्यादित न राहता विचार करण्यास प्रोत्साहित करतो. डिजिटल, टेलिव्हिजन आणि चित्रपटगृह या तिन्ही माध्यमांवर सादर करता येतील अशा प्रभावी कथा घडवण्यावर भर दिला जाणार आहे.
या संदर्भात झी आणि ZEE5 चे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव यांनी सांगितले की, भारतातील वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरेला संस्थात्मक व्यासपीठ देणे ही काळाची गरज आहे. झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट ही केवळ स्पर्धा नसून भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवण्यासाठी उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. या उपक्रमाद्वारे नवोदित फिल्ममेकर्सना केवळ रोख पारितोषिकेच नव्हे, तर व्यावसायिक चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करण्याची आणि ‘Z’च्या व्यापक कॉन्टेन्ट इकोसिस्टममधील विविध सहकार्यांच्या संधी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.






