(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलेहोते. तर झी टॉकीजची आणि आताची झी स्टुडिओज ही त्यांची पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एक नवा कोरा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर समाजमाध्यमावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
Asarani : असरानी यांचे शेवटचं स्वप्नं राहिले अपुरे, जाणून चाहत्यांनाही होईल पश्चाताप
फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, “तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावरच आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. याचदरम्यान मी ‘द फोक आख्यान’ हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला, परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे.’
पुढे म्हणाले, ‘या कलाकारांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच फुलवरा चित्रपटाची गोष्ट तयार झाली. ‘द फोक आख्यान’ ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास थक्क करणारा आहे आणि हर्ष – विजय या तरुण जोडगोळीला असलेली लोकसंगीताची जाण ही कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलवराची गोष्ट तयार झाली.’ असे ते म्हणाले.
ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल
‘फुलवरा’ चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात असून याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.