(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘सन मराठी’ वरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिका सध्या चर्चेत आहे. १४ जुलैपासून सुरु झालेल्या या नव्या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतून पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडली आहे. मालिकेच्या प्रत्येक भागाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. यातील कलाकार आणि कथा त्यांना आवडत आहेत. मालिकेत तेजा-वैद मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच, मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सीमा घोगळे एका खास भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतत आहे.
‘सन मराठी’ वरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात येत आहेत. पण तेजा कायम वैदहीच्या बाजूने खंबीर उभा राहतो. माईसाहेबांसह मालिकेत अभिनेत्री सीमा घोगळे ‘पुष्पा’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्रीला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज
भूमिकेबद्दल सीमा घोगळे म्हणाल्या की, “यापूर्वी बरेचदा खलनायिकेची भूमिका साकारली आहे, पण ‘पुष्पा’ भूमिकेत बऱ्याच वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे ही भूमिका साकारताना दडपण येत आहे, पण दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनामुळे पुष्पा साकारणं सोपं होत आहे. मला या रूपात पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? याकडे माझं लक्ष आहे. पुष्पा मक्तेदार घराण्यातील मोठी जाऊबाई असली तरी, घरात तिला सत्तेचा पूर्ण हक्क नाही. माईसाहेब सगळे निर्णय घेतात आणि हेच पुष्पाच्या अस्वस्थतेचं कारण आहे.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘सत्ता मिळवण्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धती वापरते. कोणाशी गोड बोलते, तर कोणाला फसवते. तेजाला ती आपल्या मुलासारखं मानते, पण त्याचा उपयोग करून माईसाहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. पुष्पा ही केवळ खलनायिका नाही, ती एक सत्तेला भुकेली बाई आहे, जी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडते. माईसाहेबच्या सावलीत वावरणारी, पण स्वतःचं अधिराज्य निर्माण करू पाहणारी ही ‘पुष्पा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवेल ही खात्री देऊ शकते.’ असे अभिनेत्रीने म्हटले आहेत.
यापुढे त्या म्हणाल्या की, ‘माझी सन मराठीसोबत ही पहिली मालिका आहे. चिन्मय मांडलेकर, विकास पाटील, विनोद लव्हेकर आणि निखिल शेठ एकंदरीतच पोतडी एंटरटेनमेंट ह्या टीम सोबत मी दुसऱ्यांदा काम करते आहे. या सगळ्यांमुळे मला पुष्पा ही भूमिका साकारायला मिळत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नाशिक मध्ये शूटिंग करण्याची संधी मिळाली. मुंबईच ट्राफिक, धावपळ या पासून थोडं लांब नैसर्गिक वातावरणात शूटिंग करताना खूप समाधान मिळत. कितीही तास शूटिंग केलं तरी १५ मिनिटात घरी पोहचणार हे सुख वेगळंच आहे. त्यामुळे काम करायला आणखी छान वाटतं.’