pridarshan jadhav abhinay berde rohit haldikar starrer all is well marathi movie poster released on social declared released date
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे.
मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून तिघांसोबत या चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
पोटापाण्याच्या शोधात मुंबईत आलेल्या अमर,अकबर आणि अँथनी या तिघांच्या आयुष्यात एका अनपेक्षित घटनेने कशी खळबळ उडते? याची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आणि ही उलथापालथ निस्तरताना त्यांची मैत्री कशी खुलते, हे मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या चित्रपटा मधून केला आहे.
चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत.
प्रियदर्शन, अभिनय, रोहित हे जबरदस्त त्रिकुट २७ जूनला ‘ऑल इज वेल’ म्हणत चित्रपटगृहात धुडगूस घालायला सज्ज होत आहेत.