( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अभिनेता दिलजीत दोसांझ याची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक हनी त्रेहान यांचा ‘सतलुज’ चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ZEE5 वरून अचानक हटवण्यात आल्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (DSGMC)ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर चित्रपटाचे विविध ठिकाणी सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे.
मंगळवारी डीएसजीएमसीचे अध्यक्ष हरमीत सिंग कालका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘सतलुज’ हा चित्रपट जसवंत सिंग खालरा यांच्या संघर्षमय आयुष्यावर आधारित असून त्यांनी समाजासमोर सत्य कसे आणले, हे यात दाखवण्यात आले आहे.
कालका म्हणाले, “खालरा यांनी ‘बेवारस’ म्हणून जाळण्यात आलेल्या सुमारे २५ हजार मृतदेहांचे सत्य जगासमोर आणले. त्यांनी हा मुद्दा केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मांडला. अशा व्यक्तीची कहाणी दडपण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असून त्यामुळे शीख समाजात संतापाची लाट आहे.”
यासोबतच डीएसजीएमसीने चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. समितीने आपल्या सर्व गुरुद्वारा सदस्यांना चित्रपट डाउनलोड करून आपल्या परिसरात सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचेही कालका यांनी सांगितले.
‘सतलुज’मध्ये दिलजीत दोसांझने जसवंत सिंग खालरा यांची भूमिका साकारली आहे. बँकेत नोकरी करणारे खालरा पुढे मानवाधिकार कार्यकर्ते बनले आणि १९८०-९० च्या दशकात पंजाबमधील कथित बनावट चकमकी तसेच गुप्त अंत्यसंस्कारांच्या प्रकरणांचा पर्दाफाश केला. १९९५ मध्ये त्यांचे अपहरण झाले आणि ते बेपत्ता झाले. जवळपास दहा वर्षांनंतर पंजाब पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांना त्यांच्या अपहरण, छळ आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. मात्र, आजतागायत त्यांचा मृतदेह सापडलेला नाही.
विशेष म्हणजे, या चित्रपटाचे मूळ नाव ‘Punjab 95’ होते. सेन्सॉर बोर्डाने तब्बल १२० कट्स सुचवल्यामुळे हा चित्रपट जवळपास चार वर्षे अडकून पडला होता. त्यानंतर ‘सतलुज’ या नव्या नावाने कोणत्याही कटशिवाय ३ जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, अवघ्या दोन दिवसांत म्हणजे ५ जुलै रोजी तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. ZEE5 ने यामागे “काही घडामोडी” हे कारण दिले, तर काही माध्यमांच्या वृत्तांनुसार आयटी नियमांचे कथित उल्लंघन हे चित्रपट हटवण्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, डीएसजीएमसीच्या निर्णयामुळे ‘सतलुज’भोवतीचा वाद आणखी तीव्र झाला असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






