शिवानी सोनार सांगतेय तारणीचा अनुभव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मालिकांमध्ये आता वैविध्य येऊ लागले आहे. सासू-सुनेच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विषयाला हात घातला जात आहे आणि अशीच एक मालिका म्हणजे ‘तारिणी’. या मालिकेतला प्लॉट संपूर्ण वेगळा आहे. एका अंडरकव्हर कॉपची भूमिका साकारणाऱ्या शिवानी सोनारने ‘नवराष्ट्र’सह खास बातचीत केली आहे.
मालिकांमधून काम करताना वेगवेगळे अनुभव घेता येतात. पण स्टंट करताना आणि एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकरताना शिवानीला कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागलं आणि ती कशा पद्धतीने स्टंट करत आहे याबाबत तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायची नक्कीच उत्सुकता होती आणि ती हे कशा पद्धतीने साकारते आहे आपण जाणून घेऊया.
ही भूमिका निवडताना काय विचार होता?
शिवानीने अगदी उत्साहाने सांगितले की, खरंत तर जेव्हा ही भूमिका तिच्याकडे आली तेव्हा तिला केवळ २ वाक्यात कथा सांगण्यात आली होती आणि ती तिला अत्यंत आवडली आणि तिने लगेच होकार दिला. या भूमिकेतून घरातील तारिणी आणि अंडरकव्हर ऑफिसर या दोन्ही व्यक्तिरेखा तिला एकाच वेळी साकाराव्या लागत आहेत आणि हे करताना खूप मजा येत असल्याचे आणि शिकायला मिळत असल्याचे शिवानीने आवर्जून सांगितले.
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
Action Scene चे प्रशिक्षण घेतले का?
मालिकेत सतत Action करावी लागणार हे माहीत होतं. पण तसं प्रशिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि याची खंत आहे, शिवानीने स्पष्ट केले. मात्र या मालिकेत खूप वेळा असे सीन करावे लागतात आणि त्यामुळे फायनल शूटिंग करण्याआधी ३-४ वेळा याचा सराव केला जातो.
सर्वात पहिले Action Master जे शिकवतात त्यांच्यासह सराव केल्यानंतर, गुंडांची भूमिका करणाऱ्या सहकलाकरांसह सराव केला जातो आणि त्यानंतरच फायनल टेक केला जातो असं शिवानीने सांगितले. इतकंच नाही तर या गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायला हवं असं मनापासून वाटतं पण शूटिंगमध्येच १५-१६ तास जात असल्याने ते करता येत नाहीये याची खंतही शिवानीने यावेळी बोलून दाखवली.
नऊवारी साडीतील प्रोमो करताना नक्की काय घडले?
शिवानी आयुष्यात पहिल्यांदाच Action Scene करत होती आणि नऊवारी साडीत प्रोमो शूट करताना तिने हिल्सचे शूज घातले आणि त्यामुळे पहिलाच सीन करतानाचा तिचा अनुभव भयानक ठरला होता. नऊवारी नेसताना भारी वाटलं होतं, पण सीन करायला गेल्यावर खूपच कठीण होता. हिल्स असल्यामुळे पाय अडकून शिवानी पडली आणि तिचा लहानसा अपघात झाला होता. पण त्यानंतर तिने कानाला खडा लावला आणि आता कोणत्याही Action सीनच्या वेळी ती पायात कम्फर्टेबल असणारे शूज घातले असं शिवानीने सांगितले.
पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना खूपच कौतुक वाटतं आणि तारिणीतील नायिका ही महत्त्वाची आहे. त्यामुळे हे करताना खूप काही शिकायला मिळत आहे आणि मालिका आणि तारिणीच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून ‘कष्टाचं चीज’ झाल्यासारखं वाटतंय असं समाधानाने शिवानी म्हणाली.
ही भूमिका साकारताना काय आव्हान आहे?
शिवानीने सांगितले की, खरं तर यातील Action Scene करणे हेच मोठे आव्हान आहे. कारण ते करताना प्रचंड एनर्जी द्यावी लागते आणि एक सीन केल्यानंतरही फारच दमायला होतं. दिवसातून १५-१६ तास काम करताना हे सांभाळणं कठीण असतं. ही भूमिका साकारताना हेच मोठं आव्हान आहे. पण जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळतं तेव्हा मात्र आपण करत असलेल्या मेहनतीचं फळ मिळतंय याची जाणीव होते आणि त्यामुळे पुढील काम करायला अधिक हुरूप मिळतो.
या भूमिकेसाठी काही खास Diet आहे का?
अशा स्वरूपाचे स्टंट करण्यासाठी खाण्यापिण्याकडेही व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं हे खरं आहे. पण हा प्रश्व विचारल्यावर शिवानी मनापासून म्हणाली की, डाएट करायची खूपच इच्छा आहे. शरीरातून आतून फिट रहायला हवंय हे कळतंय पण कामाच्या व्यापातून अजिबात वेळ मिळत नाहीये. मात्र यातून कशी सांगड घालायची हा मार्ग लवकरच काढणार असल्याचं शिवानीने सांगितलं. कारण महिन्यातून २५-२६ दिवस ती या मालिकेचे शूट करते आणि त्यापैकी दिवसातून १५-१६ तास शूटिंग चालू असतं. मग असं असताना अगदी काटेकोर डाएटकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये अशी खंत तिने व्यक्त केली आणि लवकरच ‘हेल्थ आणि शूट’ याची सांगड घालत याकडे लक्ष पुरवणार असल्याची इच्छाही तिने बोलून दाखवली.
‘चंद्रघंटा देवी माझ्या स्वभावाशी जुळणारी आहे’ अभिनेत्री शिवानी सोनारने देवीशी स्वतःची तुलना का केली?
नवीन लग्नानंतर घर आणि करिअर कसं सांभाळत आहेस?
शिवानी आणि अंबर गणपुलेचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे आणि त्यामुळे तिची दमछाक होतेय का असं विचारल्यावर शिवानीने एका क्षणाचाही विलंब न करता सांगितले की, ‘एकाच क्षेत्रात असल्याने नवऱ्याचा खूपच चांगला पाठिंबा आहे त्यामुळे घर आणि करिअर दोन्ही गोष्टी सांभाळणं खूपच सोपं झालंय. एकमेकांना वेळ देता येत नाही हे खरं असलं तरीही लग्नाआधीच काही गोष्टी क्लिअर केल्याने त्यात काही अडथळा येत नाही आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो आम्ही एकमेकांनाच देतो, सुट्टी असताना आम्ही एकमेकांसह असतो’, यामुळे घराकडे आणि करिअरकडे उत्तमरित्या लक्ष देता येत आहे असं शिवानी म्हणाली.