(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही तर त्याच्या रूग्णांच्या कथा आणि व्यथांमधून होत असते. कुठल्या तरी आजारापायी जेव्हा एखाद्या रूग्णाचा जीव पणाला लागलेला असतो, तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचीही प्रत्येक वेळी नव्याने परीक्षा होत असते. त्यात तो पास झाला तरच ‘ताठ कण्यानं’ जगाला सामोरा जाऊ शकतो. अशाच एका ध्येयवेड्या, संशोधनात झोकून दिलेल्या एका डॉक्टरची कथा आहे- ताठ कणा. डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्मसचे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत.
जागतिक ख्यातीप्राप्त आणि आज वयाच्या ८६ व्या वर्षीही दररोज ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीसाठी सज्ज असलेल्या न्यूरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांच्या विलक्षण आयुष्याची ही क्षणाक्षणाला वेगळी वळणे घेणारी सत्य कथा.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असूनही डॉक्टर होण्याचा ध्यास त्यांनी घेतला. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर एका मोठ्या आरोपाला सामोरे गेले. त्यातून सुखरुप बाहेर पडल्यावर मोठी नोकरी सोडून देशात परत आले. द्वेष, असूया, अविश्वास यांच्याशी लढत त्यांनी अनेकांच्या पाठीचा कणा ताठ केला. परंतु एक दिवस त्यांच्या संशोधनाची अशी कसोटी लागली की सगळी बोटे त्यांच्याकडे रोखली गेली. त्याचवेळी एका ‘प्रेमा’च्या हाकेने त्यांना दुसरे एक आव्हान स्वीकारण्यास भाग पाडले.
इतरांच्या पाठीच्या कण्यावर उपचार करता करताच स्वतःच्या संशोधनाचा, इतरांच्या त्यांच्यावरील विश्वासाचा आणि पत्नीच्या द्विधा मनस्थितीचा कणा सांभाळत त्यांनी अखेर ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकले…पुढे काय झाले त्याची उत्कंठावर्धक कथा म्हणजेच संघर्ष, जिद्द आणि प्रेमाचा ‘ताठ कणा’. उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे,अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.