Ashok Saraf Birthday Indranil Kamat Shared Special Post
मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेजगतामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये कायमच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं नाव घेतलं जातं. मुख्य बाब म्हणजे, हे नाव कायमच आदराने घेतलं जातं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीमध्येही आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या अशोक सराफ यांनी त्यांच्या सिनेकरियरमध्ये ३०० हून अधिक चित्रपट दिले आहेत. अशा बहुआयामी कलाकाराचा आज ७८ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त एका प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
सध्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ कलर्स मराठीवरील ‘अशोक मामा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेतील कलाकारांनी अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा देत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता इंद्रनील कामतने अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना ‘हिमालयाची सावली’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेता इंद्रनील कामत याने लिहिलेय की, “हिमालयाची सावली… तुम्हाला म्हणालो तसं, मी माझ्या कॉलेजवयीन मित्र इंद्रनीलला सांगितलं की, मी आता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं तर हसेल तो माझ्यावर, विश्वास नाही बसणार त्याला. तुमच्यासोबत काम करत असताना कामावर निष्ठा कशी ठेवावी हे समजून घेता आलं. मला माणूस म्हणून, कलाकार म्हणून तुम्हाला अनुभवता आलं, काम करण्याची संधी मिळाली हा मी स्वामींचाच आशीर्वाद समजतो! तुम्ही आम्हा तरुण कलाकारांना विश्वास दिलेला आहे की मराठीमध्ये सुद्धा सुपरस्टार निर्माण होऊ शकतो. तुमच्या इतकं वलय निर्माण करणं अशक्यच पण तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा कलाकार म्हणून नेहमीच प्रयत्न राहील. तुमच्या वाढदिवसानिमत्त मी आशीर्वादच मागेन! तुम्हाला मी काय शुभेच्छा देणार, तुम्ही आमचे सुपरस्टार आहात, यंग मॅन! हॅपी बर्थडे! ।।श्री स्वामी समर्थ।।”