(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राच्या घरोघरी विनोदाचा वर्षाव करीत लोकप्रिय झालेल्या कॅामेडी क्वीन विशाखा सुभेदारची मुख्य भूमिका असलेला ‘वेल डन आई’ हा चित्रपट मुहूर्तापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. टीझर मागोमाग या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३१ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असलेल्या ‘वेल डन आई’चा ट्रेलर अतिशय उत्कंठावर्धक आणि कुतूहल वाढवणारा आहे.
या सिनेमाच्या ट्रेलर प्रकाशन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सर्व आईंना समर्पित असलेल्या ‘वेल डन आई’ चित्रपटाचा ट्रेलर कलाकार-तंत्रज्ञाच्या आईच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. दीपाली प्रोडक्शन या बॅनरअंतर्गत निर्माते सुधीर पाटील यांनी ‘वेल डन आई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या लेखनासोबतच दिग्दर्शनही शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन संदीप गचांडे व शंकर धुलगुडे यांनी केले आहे. ‘वेल डन आई’च्या टीझरने सोशल मीडियावर लक्ष वेधल्यानंतर आता ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
‘तुला नाही वाटत का माझं लग्न व्हावं…’ असा नायकाने आपल्या आईला विचारलेल्या प्रश्नाने ट्रेलरची सुरूवात होते. आईच्या भूमिकेत असलेली विशाखा सुभेदारही आपल्या मुलाचे लग्न व्हावे अशीच इच्छा व्यक्त करते. आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षदा टाकत ‘शुभमंगल सावधान…’ म्हणण्यासाठी आतुरलेल्या या आईसमोर काही आव्हाने आहेत. तिचा पती शांताराम माने हाच तिच्यासमोरील मोठे आव्हान असते. नवरदेवाची आई मुलाचे लग्न करण्यासाठी काय काय शक्कल लढवते, पतीची कशी समजूत घालते, या सर्व गदारोळात नायक-नायिकेचे लग्न होते की आणखी काय होते ते चित्रपटात पाहायला मिळेल. नवरदेवाचे वडील आणि नवरीमुलीचे वडील यांच्यातील वाद आणि अभिनयाची जुगलबंदीही या चित्रपटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दोघांमधील दुरावा कमी करण्यासाठी आणि मुलाचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आई एक प्लॅन आखते. तो प्लॅन कोणता ते चित्रपटात पाहायला मिळेल.
Exclusive: ‘कमळी ही मोठी जबाबदारी, मेहनत करून प्रेक्षकांना जिंकायचंय’ – विजया बाबर
ट्रेलरबाबत दिग्दर्शक शंकर धुलगुडे म्हणाले की, ‘वेल डन आई’ची अचूक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. नाट्यमय वळणांची पटकथा, खुमासदार संवाद, विनोदी प्रसंगांची गुंफण आणि कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. एक संवेदनशील विषय विनोदाच्या साथीने प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांचे परीपूर्ण मनोरंजन होईल याची खातरजमा करत हा चित्रपट बनवला आहे. आजवर लग्नावर बरेच चित्रपट आले असले तरी यातील गंमतीजंमती खूप वेगळ्या असल्याने त्याच प्रेक्षकांना अधिक भावतील असे मतही धुलगुडे यांनी व्यक्त केले.
Diwali 2025: प्राप्ती रेडकरने फटाके फोडणं थांबवलं तर महिमा म्हात्रे काढतेय भाऊबीजेची आठवण
‘वेल डन आई’मध्ये शीर्षक भूमिकेतील विशाखा सुभेदारसोबत विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार संदीप गचांडे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीतसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत ऍग्नेल रोमन यांनी दिले असून, निलेश गावंड यांनी संकलन केले आहे. काफिल अन्सारी या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड, मानस रेडकर सहदिग्दर्शक, तर राज्यपाल सिंह कार्यकारी निर्माते आहेत. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे. कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी केले असून, रंजीत साहू यांनी छायांकन केले आहे. केशभूषा मयुरी बस्तावडेकर यांची, तर नृत्य दिग्दर्शन चिनी चेतन यांची आहे. रंगभूषा माधव म्हापणकर यांनी केली असून, वेशभूषा प्रतिभा गायकवाड यांनी केली आहे.