'तुला जपणार आहे' मालिकेतील अंबिका अर्थात अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकरशी खास बातचीत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगात जशी चांगली शक्ती असते ज्याला आपण देव मानतो तशीच वाईट शक्ती असते असं अनेकांना वाटतं आणि अशा स्वरूपाच्या कथादेखील वाचायला वा पहायला प्रेक्षकांना आवडतात. अशीच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतलेली मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’. अंबिका, मीरा आणि मंजिरी यांच्याभोवती फिरणारी ही कथा म्हणजे प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका ठरत आहे.
सध्या ही मालिका एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. अंबिकाला आता मंजिरीचं खरं स्वरूप कळणार का? वेदाला अंबिका आणि मीरा वाचवू शकणार का? मंजिरी आपल्या अघोरी कृत्यांमध्ये यश प्राप्त करणार का? देवी आजी कशी साथ देणार? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहे आणि याच निमित्ताने नवराष्ट्रने अंबिका भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकरशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
ही भूमिका स्वीकारताना काय विचार केला?
प्रतिक्षाने अगदी उत्साहात सुरूवात केली आणि म्हणाली, ‘खरं सांगायचं तर अगदी ‘तुला जपणार आहे’ मालिकेसाठी ऑडिशन प्रोसेस करून ही भूमिका मला मिळाली. पण सुरूवातीला अंबिका ही भूमिका करू की नको याबाबत मी जरा साशंकच होते. पहिल्यांदाच आईची भूमिका करायची होती आणि यामुळे पुढे लीड रोल मिळेल की नाही हा विचार मनात येत होता. पण आता १ वर्षाने जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा विचारपूर्वक दिलेला होकार अगदी योग्य ठरलाय हे जाणवतं’. यानंतर प्रतिक्षाने एक किस्साही सांगितला, ‘आता मी जेव्हा कुठे बाहेर जाते तेव्हा प्रेक्षक मला वेदाची आई म्हणून ओळखतात आणि मला खूपच मज्जा वाटते. ही भूमिका मी जगू शकले ती प्रेक्षकांपर्यंत पोहचली याचा खूपच आनंद आहे’
मायाच्या जाळ्यात अडकली मीरा, वाचवण्यासाठी अथर्वची धावपळ; ‘तुला जपणार आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट
भुताची भूमिका करताना काय अनुभव?
यावर प्रतिक्षा अगदी मनापासून हसत म्हणाली, ‘इतर भूमिका करताना आपल्याला खरं तर अभ्यास करावा लागतो. ही भूमिका नक्की कशी आहे, कसं बोलणार, कसं वागणार? पण आपण भूत पाहिलेलंच नाही, त्यामुळे नक्की ‘भूत आई’ म्हणून मी अभ्यास तरी काय करणार असाच प्रश्न होता माझ्यासमोर. पण दिग्दर्शकांचा दृष्टीकोन कसा आहे त्यावर हे काम सुरू केलं. मी सेटवर जाताना किंवा कोणत्याही प्रोजेक्टसाठी कोरी पाटी घेऊनच जाते, कारण एखादी मालिका सुरू करताना निर्माता, दिग्दर्शक यांचं काम अनेक वर्ष-महिने सुरू असतं, कलाकार म्हणून ते जे सांगतील ते काम करण्याची तुमची क्षमता असायला हवी या मताची मी आहे आणि या भूमिकेबाबतही मी तेच केलं’
पुढे या भूमिकेबाबत सांगताना प्रतिक्षा म्हणाली, ‘अंबिका कोणत्या वेळी कशी वागू शकते, याबाबत सहकलाकारांशी, दिग्दर्शकांशी चर्चा करून काम करते. त्यामुळे ती भूमिका सहज झाली आणि प्रेक्षकांनाही आवडली असं मला वाटतं’
देव आणि भूत यावर तुझा विश्वास आहे का?
प्रतिक्षाने एका क्षणाचाही विलंब न करता सांगितले की, ‘चांगली शक्ती आणि वाईट शक्ती या दोन्हीवर माझा विश्वास आहे. मी कृष्णावर विश्वास ठेवते. आपण नेहमीच सकारात्मक विचार करून पुढे जातो. पण त्याचप्रमाणे जगात वाईट गोष्टीही असतातच आणि वाईट शक्तीही आहे’
फूडी असल्याने सेटवरच किचन थाटलं असल्याचं ऐकलं, काय करतेस?
अगदी मनापासून प्रतिक्षा म्हणाली, ‘हो मी फूडी आहेच पण माझ्याइतक्याच पौर्णिमा ताई आणि तनिष्का दोघीही फूडी आहेत. पौर्णिमा ताईंना तर सर्वांना करून खायला घालायला आवडतं आणि आम्ही अगदी रॅकमध्ये ताटं, भांडी, वाट्या सगळं आणून ठेवलंय. बटर, केचअप सगळं असतं आमच्याकडे. कधी सँडविच बनवून खा वगैरे अशी सगळी मस्त खादाडी चालू असते’
शर्वरीसह बाँड कसा आहे?
मालिकेत शर्वरी ही मंजिरीची भूमिका साकारत आहे आणि अंबिकाची भूमिका प्रतिक्षा करत आहे, यावर प्रतिक्षा पटकन म्हणाली की, ‘जर क्रोमावरती सीन करताना BTS काढले ना तर आम्ही दोघी फक्त धमाल करताना आणि सतत हसतानाच दिसू. क्रोमावरचे सीन करताना नक्की खड्डा कुठे काही अंदाज नसतो. दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार आम्ही करतो, पण सर्वात धमाल मला शर्वरीसह येते. कोणीही हेच सांगेल की शर्वरी-प्रतिक्षा नुसत्या हसत असतात’
मंजिरीचा डाव पुन्हा फसणार; सत्याचा विजय होणार, ‘तुला जपणार आहे’ मालिकेला नवं वळण
2025 वर्ष कसे होते आणि नव्या वर्षाचा संकल्प काय?
प्रतिक्षाने म्हटले की, ‘मला हे वर्ष कसे गेले कळलंच नाही. आधीही मी मालिकांमध्ये काम केलंय पण २०२५ पटकन संपलं असं वाटतंय. या मालिकेत काम करताना दिवस कधी आला कधी गेला काहीच कळत नाहीये. चांगल्या माणसांमुळे कामाचा वीट आला नाही आणि मुळात हे वर्ष खूपच आनंदात आणि मजेत गेलं. मी जास्त संकल्प वगैरे करत नाही पण २०२६ मध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग्य प्रयत्न राहवेत इतकाच संकल्प करेन आणि तसंच काळजी घेईन हे नक्की’
प्रतिक्षाने अगदी भरभरून आणि मनापासून नवराष्ट्रसह गप्पा मारल्या आणि आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. मालिकेतील अंबिका आणि प्रत्यक्षातील प्रतिक्षा या मात्र अगदीच मनमोकळ्या आणि तितक्याच निर्मळ असल्याचं नक्कीच जाणवलं.






