शरीराला सर्वच विटामिनची समान आवश्यकता असते. पण काहीवेळा शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता निर्माण होते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमधून कटकट आवाज येण्यास सुरुवात होते, तर काहीवेळा स्नायूंमध्ये वेदना, बसताना उठताना कंबर दुखणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात आवर्जून या पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यासोबतच हाडांची झालेली झीज भरून निघेल आणि हाडांमध्ये वेदना होणार नाहीत. (फोटो सौजन्य – istock)
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? मग आहारात न चुकता करा 'या' पदार्थांचा समावेश

तरुण वयात गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

कॅल्शियम वाढवण्यासाठी अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे अळीव. अळिवाचे लाडू किंवा पेज बनवून खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

दैनंदिन आहारात नाचणीच्या भाकरीचे किंवा नाचणी आंबीलचे सेवन करावे. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक हाडे मजबूत करतात.

कॅल्शियम वाढवण्यासाठी राजगिऱ्याच्या लाडूचे आहारात सेवन करावे. नियमित एक किंवा दोन लाडू खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि कॅल्शियम वाढण्यास मदत होईल.

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आवर्जून खावेत. नियमित दूध, दही किंवा चीज खाल्ल्यास दोन ते तीन महिन्यांमध्ये फरक दिसून येईल.






