कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण हा आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीरात पसरतात. हा आजार रोजच्या वापरातील वस्तूंच्या अतिवापरामुळे होण्याची जास्त शक्यता असते. या वस्तूंमध्ये असलेले हानिकारक रसायन शरीराला दीर्घकाळासाठी कॅन्सरचा धोका वाढवतात. चला तर जाणून घेऊया रोजच्या वापरातील कोणत्या गोष्टींमुळे वाढतो कॅन्सरचा धोका. (फोटो सौजन्य – istock)
कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या वापरतील 'या' वस्तू

शिल्लक राहिलेले जेवण कायमच प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवले जाते. तर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच प्लॅस्टिक पाणी बॉटलचा वापर करतात. यामध्ये असलेले बीपीए आणि फ्थालेट्स रसायने अन्नपदार्थांमध्ये मिक्स झाल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

जुनी किंवा खरचटलेल्या नॉन स्टिक भांड्याचा वापर करू नये. भांड्यांमध्ये असलेल्या टेफ्लॉन कोटींगमधून पीएमएएस सारखे विषारी वायू बाहेर पडतात, ज्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो.

कुत्रिम सुगंध असलेल्या मेणबत्त्या जाळल्यानंतर त्यातील रसायने हवेमध्ये पसरतात. बेंझिन आणि टोल्यूइन सारखे घातक घटक हवेमध्ये मिक्स झाल्यानंतर फुफ्फुसांमध्ये साचून राहण्याची जास्त शक्यता असते.

हेअर स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट्स, निकृष्ट दर्जाची नेलपॉलिश आणि कॉस्मॅटिक्समध्ये फॉर्मल्डहाईड किंवा पॅराबिन्ससारखे घटक आढळून येतात, ज्यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते.

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जंक फूड किंवा पॅक बंद पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांमध्ये मीठ आणि नायट्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते.






