भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा 'हायव्होल्टेज ड्रामा'
भंडारा : भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले आहे. असे असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांनी आपली मते सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांना जिल्ह्याबाहेर अज्ञात ठिकाणी रवाना केले. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सावध पवित्रा घेतला.
भाजपने नामांकनाच्या अखेरच्या दिवशीच महायुतीच्या मतदारांना विशेष १२ ट्रॅव्हल्स बुक करून गुप्तस्थळी रवाना केले. तर काँग्रेसनेही याला उत्तर देत ५० हून अधिक मतदारांना थंड हवेच्या ठिकाणी पाठविल्याची माहिती आहे. हे मतदार आता थेट १८ जून रोजी मतदानाच्या दिवशीच परतणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे लोकप्रतिनिधी आता स्वतःच्याच पक्षाच्या वलयांकित सुरक्षित कैदेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
महायुतीत धुसफूस, भोंडेकरांची नाराजी
एकीकडे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे महायुतीच्या अंतर्गत नाराजीचा स्फोट झाला. शिवसेना शिंदे गट आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. मित्रपक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, निवडणुकीच्या काळातच मित्रपक्षांची आठवण येते, बाकी वेळ आमचा अपमान केला जातो, अशा शब्दांत त्यांनी खदखद व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामात भाजप नेत्यांचा हस्तक्षेप आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून निधी न मिळणे, ही भोंडेकर यांच्या तक्रारीची प्रमुख कारणे आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही असंतोष
राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा धसका केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार गटामध्ये असंतोष खदखदत आहे. मूळचे राष्ट्रवादीत असलेले मात्र, साकोली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेले अविनाश ब्राह्मणकर यांचा पराभव झाल्यानंतर, आता त्यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. या माध्यमातून एकप्रकारे भाजपने राष्ट्रवादीला काटशह दिल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या गोटात सस्पेन्स
काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. नामनिर्देशन पत्र भरताना काँग्रेसने रणनीती आखत दिलीप बन्सोड, प्रफुल्ल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांच्या माध्यमातून तीन अर्ज दाखल केले. ही काँग्रेसची चाल आहे की, तांत्रिक कारणामुळे एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून ही खेळी खेळली गेल्याचा कयास आहे. राजकीय समीकरणांनुसार, अग्रवाल यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच यावर शिक्कामोर्तब होईल.






