भाजप नेते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
भाजप नेते नवनाथ बन म्हणाले की, “औरंगजेबाचा डीएनए असणाऱ्या खासदार संजय राऊतांना हिंदू सणांबद्दल आकस आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोध करण्याचे काम अपशकुनी राऊत मामा करत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला फुटकळ कारणे पुढे करून त्यांनी विरोध केला. मात्र मुस्लीमांचा इज्तेमा असता तर राऊतांनी त्यांचे स्वागत केले असते. नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध नसतानाही, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या तालावर नाचत, राजकीय भांडवल करत सिंहस्थ कुंभमेळ्यावर राऊत टीका करत आहेत,” अशा शब्दांत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामीनावर बाहेर आहेत, ज्यांनी 100 दिवस तुरुंगाची हवा खाल्ली, पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची ज्यांनी घरे लाटली असे राऊत हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हेच हास्यास्पद आहे अशी टीका नवनाथ बन यांनी केली. राऊत यांनी त्यांची भांडुप आणि अलिबागमधील मालमत्तेच्या विक्रीस सुरुवात करावी आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी शेतक-यांना मदत करावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या कार्यकाळात रोज 100 कोटींची वसुली करून 9.5 लाख कोटीं जमा केले होते त्या पैशांनी शेतक-यांना मदत करावी म्हणजे शेतक-यांचा सातबारा कोरा होण्यास हातभार लागेल,” असा खोचक सल्ला भाजप नेत्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत यांना शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने शेतकऱ्यांना दमडी देखील दिली नाही. बांधावर जाऊन पंचवीस हजार रुपये हेक्टरी देऊ अशा बाता मारल्या मात्र मदत केलीच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ओल्या दुष्काळातून शेतक-यांना बाहेर काढण्यास प्राधान्य असून टप्प्याटप्प्याने मदत केली जात आहे. लवकरच सातबारा देखील कोरा केला जाईल असे त्यांनी नमूद केले. ओल्या दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतक-यांसाठी महायुती सरकारने आधी 32 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. काल आणखी 11 हजार कोटींची मदत शेतक-यांच्या खात्यात कशी पोहोचेल यासाठी कॅबिनेट बैठक घेतली. आत्तापर्यंत 40 लाख शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचलेत. शेतक-यांच्या नावावर आंदोलन करणा-या बच्चू कडूंनी आंदोलनाऐवजी काँग्रेसला याबाबत प्रश्न विचारावे असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊतांनी अलिबागमध्ये शेतकऱ्यांचे सातबारा खाल्ले
पुढे नवनाथ बन म्हणाले की, “उंदीर लोकांचे, शेतकऱ्यांचे धान्य खातो त्याप्रमाणे संजय राऊतांनी मुंबई पालिकेतील खिचडी गट्ट केली, पत्रा चाळीतली घरे खाल्ली, अलिबागमध्ये शेतक-यांचे सातबारे खाल्ले, कफन घोटाळा करून जनतेचे पैसे खाल्ले असा घणाघात नवनाथ बन यांनी केला. ‘ॲनाकोंडा’ म्हणत आमच्यावर टीका करणारे उबाठा आणि राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करत आहेत,” असे टीकास्त्र नवनाथ बन यांनी सोडले.






