विधीमंडळाबाहेर परिणय फुके यांच्या विधवा सून प्रिया फुके मुलासह धरणे आंदोलन केले (फोटो - सोशल मीडिया)
Priya Phuke vs parinay Phuke : मुंबई : राज्यामध्ये विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहेत. यामध्ये आता भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. परिणय फुके यांच्या विधवा सुनेने विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांनी लहान मुलासह विधीमंडळाच्या गेटवर बसून धरणे आंदोलन केले. त्यामुळे विधानसभेच्या गेटबाहेर घरगुती कलहांचा खेळ दिसून आला आहे.
भाजप आमदार परिणय फुके यांची विधवा सून प्रिया फुके यांनी विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी प्रिया फुके यांना अश्रू अनावर झाले आहे. प्रिया फुके यांनी मुलांसह आंदोलन केल्यानंतर सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले. सत्तेच्या जोरावर मला धमकावले जात असल्याचे त्यांनी सांगितले. घराबाहेर हाकलून लावले आहे. ते मला माझ्या मुलांना भेटूही देत नव्हते. पोलीस माझा एफआयआरही नोंदवत नाहीत, असा गंभीर आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रिया फुके यांच्या विधीमंडळाबाहेर आंदोलनावरुन वाद निर्माण झाला. विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या प्रिया फुके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर “मुख्यमंत्री गप्प का आहेत? महिला आणि मुलांचा आवाज का दाबला जात आहे? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. विधानसभेच्या गेटवर रडणाऱ्या प्रिया फुके आणि तिच्या निष्पाप मुलांचे फोटो पाहून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महिला आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधकांनी केली आणि सरकार महिलांवरील अत्याचार लपवत असल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री गप्प का?
दुसरीकडे, भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. विधीमंडळ आवारामध्ये संवाद साधताना परिणय फुके म्हणाले की, “हा कौटुंबिक वाद आहे. राजकीय हेतूने तो वाढवला जात आहे. प्रकरण न्यायालयात आहे, सत्य बाहेर येईल.” असे मत आमदार फुके यांनी व्यक्त केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात ही संपूर्ण घटना सरकारसाठी मोठी राजकीय डोकेदुखी बनली. यावर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याआधीही गंभीर आरोप
प्रिया फुके यांनी यापूर्वीही तिच्या दिवंगत पतीच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. प्रिया फुके म्हणाल्या होत्या की, “कुटुंबाकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या आणि राजकीय नेत्यांकडून मदत मागूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. त्यांनी सांगितले होते की, माझ्या पतीला २०२२ मध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकरणात माझा समावेश करण्यात आला नाही आणि रात्री १० वाजता मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असा गंभीर आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.