भाजपला बसू शकतो मोठा फटका; लोकसभेत दिसणार नाहीत महत्त्वाचे नेते 'या' नेत्यांचा होऊ शकतो पत्ता कट? (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली / संतोष ठाकूर : भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. परंतु, येणाऱ्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसाठी अनेक महत्त्वाच्या कामांची यादी तयार करण्यात आली आहे. नवीन अध्यक्ष येताच त्यावर काम सुरू करावे लागेल. यामध्ये पुढील लोकसभा निवडणुका लक्षात घेता अनेक नेत्यांना निवृत्ती घेण्याचे काम देखील समाविष्ट आहे.
पुढील सार्वत्रिक निवडणुकीत नेत्यांना तिकीट न देण्याच्या योजनेवर भाजप काम करत असल्याचे सांगितले जात आहे. 73 वर्षांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून ते 68 वर्षांचे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावे यामध्ये शक्य आहेत. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, 75 वर्षांच्या वयाचा नियम पाळणे बंधनकारक नाही. सूत्रांनुसार, 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना किमान 40-45 टक्के संधी मिळाव्यात अशी भाजपाची रणनीती आहे.
भाजपचे सर्वोच्च नेतृत्व देखील पुढील सार्वत्रिक निवडणुकांपासून महिला आरक्षण लागू करू इच्छिते. अशा परिस्थितीत, महिलांच्या 33 टक्के वाटा लक्षात घेता भाजपला त्यांच्या सध्याच्या खासदारांच्या जागा कमी कराव्या लागतील. यामुळेच नवीन अध्यक्षांसाठी मोठी कामे निश्चित केली जात आहेत.
हेमा मालिनी यांच्यासह अनेक नेत्यांचा पत्ता होणार कट?
मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (७६ वर्षे), एल ओरावं (६४ वर्षे), कृपा शंकर सिंह (७४ वर्षे), गिरीराज सिंह (७३ वर्षे), रविशंकर प्रसाद (७० वर्षे), राव इंद्रजित सिंह (७५ वर्षे) यांचा पुढील निवडणुकीतून पत्ता कट होऊ शकतो.
मोदींच्या नावावर ‘मिशन २०२९’
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सध्या ७४ वर्षांचे आहेत. परंतु असे मानले जाते की, भाजप त्यांच्या चेहऱ्यावर आणि कामावर पुढील लोकसभा निवडणुका लढवेल. हेच कारण आहे की, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड देखील तीच रणनीती लक्षात ठेवून केली जात आहे. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, दोन किवा तीन वेळा खासदार राहिलेल्या बहुतेक खासदारांना निवडणुकीच्या राजकारणाऐवजी संघटनेच्या कामात आणण्यासाठी एक योजना आखली जात आहे.