माजी खासदार इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर यांनी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत निकाल दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह पुणे पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. याबाबत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, “निवडणूक आल्यानंतर मुद्दे काय आहेत हे सगळ्यांना माहिती असतं. मात्र, ज्यांना काहीही करायचं नसतं ते जातीवर निवडणूक लढवितात. मात्र, आम्ही आमचा अजेंडा ठरविला आहे. आमचा अजेंडा विकास आहे,” असे स्पष्ट मत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आमचा पहिला ठराव आहे देशी दारू बंद करणार आहे. दारु आम्ही शहराच्या हद्दीबाहेर काढणार आहे. आमचा निवडणुकीमध्ये दुसरा ठराव हा पाणी असणार आहे. मनपा पूर्ण 30 दिवसांचे पाणी घेते. मात्र, पाणी काही दिवस देतात. मात्र, आमची सत्ता आल्यास आम्ही जेवढे दिवस पाणीपुरवठा तेवढे दिवसच कर घेतले जाईल. आगामी निवडणुकीसाठी आमची तयारी पूर्ण आहे. पूर्ण ताकतीने आम्ही निवडणूक लढविणार आहोत,” अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांत पडलेले दरोडे आणि झालेल्या चोऱ्यांत काही पोलिसांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या आरोपांवरुन देखील इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “इतकी लाचारी की, जिल्ह्याचं पालकमंत्री असे म्हणत असेल तर सामान्य लोकांनी काय करावं, फक्त आरोप करून चालणार नाही. तर यामध्ये कोणते पोलीस आहे ते दाखवावे. तुम्ही स्वतःला सिनेमानंतर मीच आहे म्हणतात तर पोलिसांची मीटिंग बोलवा आणि त्यात स्पष्ट करा. पोलिस तुम्हाला भाव देत नाही म्हणून तुम्ही असे आरोप करतात का? पोलिस डिपार्टमेंट कडून तेवढे मिळत नसेल म्हणून असे करतात का?” अशा कडक शब्दांत इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.