"विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा" शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका
मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना घोटाळे केले आणि मलिदा खाल्ला. आता त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे तोडणार, मारझोड करणार, फोडणार, फेकून देणार असे नकारात्मक राजकारण उद्धव आणि राज ठाकरे करत आहेत, असे शायना एन.सी म्हणाल्या. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आणि विकासाचे राजकारण केले. समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणाचा विचार शिंदे यांनी केला, असे शायना एन.सी म्हणाल्या. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तरुणांशी संवाद साधला त्यांच्या मुंबईबाबत अपेक्षा जाणून घेतल्या. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी महायुतीने १७००० कोटी विविध प्रकल्पांसाठी आणि योजनांसाठी खर्च करण्याचे वचन दिले आहेत. हा वचनामा सत्यात उतरणारा आहे फेकनामा नाही, असा टोला शायना एन.सी यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईत देशातील सर्वोत्तम मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. तुमच्या अहंकारामुळे मेट्रो कारशेडचे काम रखडले होते. पुढे त्या प्रकल्पाची किंमत १२ हजार कोटींची वाढली, अशी टीका शायना एन.सी यांनी उबाठावर केली. मुंबई महापालिकेत कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, मिठी नदी, रस्त्यांचे डांबरीकरण यात भ्रष्टाचार केला. त्यामुळे उबाठाचे नगरसेवक तुरुंगात गेले होते, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबईकर जनतेने महायुतीची विकास कामे पाहिली आहेत त्यामुळे येत्या १५ जानेवारी रोजी मतदार महायुतीच्या बाजूनं उभे राहतील, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर शायना एन.सी यांनी खरमरीत टीका केली. मुंबई कोणाच्या बापाची जहागिरदारी नाही. मुंबई मराठी माणसाची आहे आणि राहणार, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांनी आणि कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं, असे आवाहन शायना एन.सी यांनी केले.






