कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत येणार रंगत; महाआघाडी विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी आमनेसामने
कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या खरी राजकीय रंगत पाहायला मिळत आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राजर्षी शाहू आघाडी आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली गट यांच्या हालचालींमुळे ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठेची लढत बनली आहे.
अलीकडेच काँग्रेसचे विजय पाटील यांनी दस्तुरखुद्द आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदावरून माघार घेऊन जवाहर पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यात अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार दिवंगत कृष्णा नाना पाटील यांच्या घराण्यातून पुन्हा एकदा राजकीय पत्ते उघडले गेले आहेत.
हेदेखील वाचा : CM Fadnavis Kolhapur Visit: पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा आनंद; फडणवीसांनी काढला चिमटा
कृष्णा नाना पाटील यांचे नातू भीमराव पाटील यांनी आपल्या पत्नी सुवर्णा भीमराव पाटील यांना थेट मैदानात उतरवून राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. कृष्णा नाना पाटील घराणे माघार घेणार नाही, असा ठाम पवित्रा घेत सुवर्णा पाटील यांनी प्रचारालाही प्रारंभ केला आहे. त्यांच्यामागे अनुभव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि पाटील घराण्याची पारंपरिक ओळख अशी तिहेरी ताकद आहे.
महाआघाडीच्या तिकिटासाठी सुवर्णा पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत आहेत. काँग्रेसच्या गटात सध्या कोणतेही दुसरे प्रबळ पर्याय नसल्याने त्यांना नैसर्गिक पाठबळ मिळू शकते. स्थानिक पातळीवर त्यांचा सहज संवाद, स्वच्छ प्रतिमा आणि कुटुंबाची जुनी राजकीय परंपरा यामुळे त्यांचा चेहरा लोकांना सहज स्वीकार्य आहे.
मनीषा उदय डांगे यांचे नाव आघाडीवर
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरप्रणित राजर्षी शाहू आघाडी मनीषा उदय डांगे हे नाव आघाडीवर असून, गटाच्या नेत्यांच्या चर्चेत त्यांचा उमेदवारीचा प्रस्ताव पुढे सरकत आहे. सध्याच्या नगराध्यक्षपदासाठी राजर्षी शाहू आघाडीकडून हे प्रमुख दावेदार ठरू शकतात. मात्र, याचवेळी जवाहर पाटील यांच्या पत्नी त्रिशला पाटील यांनीही निवडणुकीत उतरायची तयारी दर्शवली आहे. त्यांनी राजर्षी शाहू आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसकडे पर्याय म्हणून दार ठोठावले आहे. मात्र, ‘ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये’, असा सूर काँग्रेसमध्ये असल्याने त्यांच्या मागणीवर संभ्रम निर्माण झाला आहे. यज्ञ त्यामुळे महिलांमधील मुकाबला सुवर्णा पाटील विरुद्ध मनीषा डांगे अशी स्पर्धा आकार घेण्याची चिन्हे आहेत.
…तर समीकरणे बदलू शकतात
महाआघाडीने जर शिवसेनेला (उद्धव गट) जागा दिली, तर समीकरणे पुन्हा बदलू शकतात. मात्र, सध्या काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीमुळे आणि सुवर्णा पाटील यांच्या आग्रही भूमिकेमुळे महाआघाडीतर्फे त्या एकमेव दावेदार म्हणून चित्र स्पष्ट आहे.
पाटील-डांगेंमध्ये प्रमुख लढत
सध्याच्या स्थितीत कुरुंदवाड नगराध्यक्षपदाची निवडणूक सुवर्णा भीमराव पाटील विरुद्ध मनीषा डांगे अशा दोन सशक्त महिला नेत्यांमध्ये रंगण्याची शक्यता अधिक आहे. महाआघाडीतील सुवर्णा पाटील यांच्या उमेदवारीला सतेज पाटील गटाची मंजुरी मिळाली, तर ही निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.






