आगामी निवडणुकीपूर्वी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या शहरांच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा होती. मात्र त्यापूर्वी मनसे नेते राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.
मनसे नेते राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेच्या मध्यस्थानी आले आहेत. मनसे कोणासोबत युती करणार याची जोरदार चर्चा आहे. मुंबई महापालिका राखण्यासाठी ठाकरे गटाने देखील तयारी केली आहे. मुंबईचा गड राखण्यासाठी आणि मराठी माणसांची मते वळवण्यासाठी ठाकरे बंधू हे उणीधुणी विसरुन एकत्र येण्याच्या चर्चा होत्या. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला होता. तसेच मराठी माणसांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र युतीपूर्वीच राज ठाकरे यांनी भाजपशी बोलणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे मुंबईमध्ये भाजपविरोधी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. नाशिकमध्ये पोस्टरबाजी देखील करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधला आहे. ठाकरे बंधू यांच्यातील हेवेदावे संपण्याची शक्यता निर्माण झालेली असताना राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड अँड हॉटेलमध्ये भेट झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये ही भेट नसताना देखील अचानकपणे ही भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्या सुमारे एक तास झालेल्या या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवली आहे. यामध्ये आगामी निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय आणि चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना बसला होता. राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये एकही जागा मिळाली नाही. यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी नवी खेळी खेळली आहे.
राज ठाकरे हे नेहमी आक्रमक पद्धतीने भाषणांमधून भूमिका घेताना दिसून येतात. मात्र भाषणाला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यामध्ये मनसे पक्षाला अद्याप यश आलेले नाही. राज ठाकरे हे भाजपवर भाषणांमधून जोरदार हल्लाबोल करताना देखील दिसतात. तर दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा देताना देखील दिसून येतात. यापूर्वी झालेल्या 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका नक्की कोणती याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.