Maharashtra Breaking News Updates Today:
27 Apr 2026 10:25 AM (IST)
ओप्पोने त्यांच्या एका ईव्हेंटदरम्यान लेटेस्ट टॅब्लेट लाँच केले आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीने OPPO Pad 5 Pro या नावाने सादर केलं आहे. हे नवीन टॅब्लेट कंपनीच्या टॅब्लेट श्रेणीमध्ये अनेक मोठे अपग्रेड्स घेऊन आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या टॅब्लेटमध्ये उच्च-रिझोल्यूशन 13.2 -इंचाचा डिस्प्ले आणि इतर अनेक प्रभावी फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच टॅब्लेटमध्ये मोठी बॅटरी आणि लेटेस्ट जेनरेशनचा पावरफुल प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. कंपनीने त्यांचे नवीन डिव्हाईस प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 58,920 रुपये आहे.
27 Apr 2026 10:15 AM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयानेच आपल्या सासरच्या घरी घुसून आपल्या सासूची आणि बायकोची चाकूने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने सासऱ्यावर देखील वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बलिया जिल्ह्यातील बछईपूर नावाच्या एका गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र त्याने असं का केलं, हत्येमागचं कारण काय? जाणून घेऊया.
27 Apr 2026 10:05 AM (IST)
ऑनलाइन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्समध्ये रँक पुश करणं प्रत्येक प्लेयरचं ध्येय असतं. मात्र हे ध्येय साध्य करताना अनेक प्लेअर्स काही चुका करतात, ज्यामुळे रँक वाढण्याऐवजी कमी होतो. तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला देखील रँक वाढवायचा असेल तर काही सामान्य चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
27 Apr 2026 09:55 AM (IST)
Donald Trump 60 Minutes interview 2026 : वॉशिंग्टनमध्ये झालेल्या हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराने आधीच खळबळ उडवून दिली होती, मात्र आता या प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. हल्लेखोर कोल थॉमस ॲलन याने लिहिलेल्या कथित जाहीरनाम्यातील (Manifesto) मजकुरामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे वैयक्तिक आरोप करण्यात आले होते, ज्याला ट्रम्प यांनी ‘६० मिनिट्स’ या कार्यक्रमात थेट उत्तर दिले.
27 Apr 2026 09:45 AM (IST)
नागपूर : संपत्तीच्या वादातून आणि घटस्फोटासाठी होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृताची पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४२, रा. कृष्ण निसर्ग अपार्टमेंट, इसासनी) असे मृत पोलिसाचे नाव आहे. आरोपींमध्ये पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांचा समावेश आहे.
27 Apr 2026 09:35 AM (IST)
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत.
३० एप्रिल २०२६ ही शेवटची मुदत राज्यातील सुमारे २६ लाख लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सरकारने या कामासाठी ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर या महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्या कायमच्या अपात्र ठरू शकतात.
27 Apr 2026 09:30 AM (IST)
राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता उष्णतेचा प्रचंड भडका उडाला आहे. विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
वाढत्या उष्णतेची सद्यस्थिती:
ऑरेंज अलर्ट: अमरावती, अकोला, वर्धा.
येलो अलर्ट: नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर.
विक्रमी तापमान: अनेक जिल्ह्यांमध्ये ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना: वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा (Sunstroke) धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
पाण्याचे सेवन: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी, लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करावे.
आरोग्याची काळजी: चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सूर्य आग ओकत असल्याने विदर्भातील परिस्थिती गंभीर बनली असून, पुढील काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
27 Apr 2026 09:25 AM (IST)
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला दोन महिने उलटले असून, युद्धविराम जाहीर होऊनही तणाव कायम आहे. मात्र, आता जागतिक स्तरावर दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला असून, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली करण्याबाबत सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून होर्मुज खाडी बंद असल्याने जगभरात ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून अनेक देशांना याचा आर्थिक फटका बसत आहे. अमेरिकेच्या धमकावण्याच्या भूमिकेमुळे इराणने थेट चर्चेला नकार दिला होता आणि त्यांचे शिष्टमंडळ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर इराणने दिलेला हा नवा प्रस्ताव कोंडी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर जागतिक तेल पुरवठा सुरळीत होऊन विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल.
27 Apr 2026 09:20 AM (IST)
मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईचे सौंदर्य अधिकच खुलते, मात्र अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय होणे आणि वाहतूक विस्कळीत होणे यांसारखी आव्हानेही उभी राहतात. मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने चौपाटीवर गर्दी करतात, पण याच काळात समुद्रात येणाऱ्या मोठ्या भरतीचा धोकाही वाढतो. उधाणलेल्या समुद्राजवळ पर्यटनाचा आनंद घेताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून वारंवार धोक्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे पावसाचा आनंद लुटताना भरतीच्या वेळा सांभाळून सुरक्षित अंतर राखणे आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
27 Apr 2026 09:15 AM (IST)
वसई: वसई येथे एक दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर आले आहे. भंगाराने भरलेल्या ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडल्याचे समोर आले आहे. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरून गेला, आणि हा अपघात घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
27 Apr 2026 09:10 AM (IST)
IPL 2026 मधील 38 वा सामना आणि या हंगामातील ‘सुपर ओव्हर’चा समावेश असलेला पहिलाच सामना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दोन्ही संघांमध्ये अत्यंत रोमांचक ठरला आणि अखेरीस ‘सुपर ओव्हर’मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. तत्पूर्वी, सामन्यात LSG चा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांची धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सनेही 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. परिणामी, सामन्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लावण्यात आला.
27 Apr 2026 09:05 AM (IST)
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हालचालींना वेग आला असून, उमेदवारीवरून अंतर्गत कलह समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे निश्चित केल्याची चर्चा असतानाच, पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून या नावांना तीव्र विरोध होत असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील निष्ठावंत आणि इतर इच्छुक नेत्यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याने या राजकीय रस्सीखेचीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
27 Apr 2026 09:00 AM (IST)
केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कारांसाठी नावे सुचवण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिफारस समितीमुळे राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र धक्कादायक बाब म्हणजे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना या समितीमधून पूर्णपणे डावलण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रक्रियेत सांस्कृतिक मंत्र्यांचा सहभाग असण्याचा पायंडा यावेळी मोडीत काढण्यात आल्याने सरकारच्या या निर्णयाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंत्र्यांच्या या अंतर्गत बदलामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
27 Apr 2026 08:55 AM (IST)
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, विदर्भातील अकोल्यात रविवारी ४६.९ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या तापमानामुळे अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या स्थानावर पोहोचले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, वाढत्या उन्हामुळे राज्यात मृत्यूचे सत्रही सुरू झाले असून लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी गेला आहे; औसा तालुक्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला. उपराजधानी नागपुरातही उष्माघाताने पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, वाढता पारा पाहता प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
27 Apr 2026 08:49 AM (IST)
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा अनपेक्षित परिणाम झाला आहे. या वादामुळे पुस्तकाबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून, अवघ्या चार दिवसांत १० हजारहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. सध्या बाजारातील सर्व साठा संपल्याने प्रकाशकांकडून नव्या आवृत्तीच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकावरून सुरू झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असला, तरी वाचक वर्गाने मात्र या पुस्तकाला मोठी पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला राजकीय तणाव वाढत असताना, दुसरीकडे या पुस्तकाच्या मागणीने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
Gold Rate Today: भारतात 27 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,403 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,119 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,552 रुपये आहे. भारतात 27 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,190 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,520 रुपये आहे. भारतात 27 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.






