राष्ट्रवादी आज ठरविणार उमेदवार (फोटो - iStock)
नागपूर : राज्यातील अनेक नगरपंचायतींसह नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यात नगरपंचायत आणि नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अद्याप महायुतीचा तिढा सुटलेला नाही. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने त्यांचे उमेदवार ठरवण्यास सुरुवात केली. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवकपदांचे उमेदवार जाहीर केले जातील. त्यानंतर 17 नोव्हेंबरपूर्वी महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यास तिन्ही पक्ष समोपचाराने त्यांचे उमेदवार मागे घेतील, असे ठरविण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायत व नगरपालिकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली. गेल्या तीन दिवसांपासून महायुतीसाठी जिल्ह्यात खलबते सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाने चर्चाच होत नसल्याने त्यांच्या मुलाखती आटोपल्या. राष्ट्रवादीनेही आधीच उमेदवारांचे पॅनल तयार केले. आता त्यांनी गुरुवारी पॅनलमधील सर्वाधिक पसंती असलेल्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्याची तयारी केली आहे. यासाठी निरीक्षकही जाहीर केले.
याअंतर्गत कामठी नगरपंचायत, बहादुरा, येरखेडा, कन्हान-कांद्री नगरपंचायतसाठी नरेश अडसडे, बेसा-पिपळा, महादुला, कन्हान-पिंपरी, बिडगाव तरोडी खुर्द नगरपंचायतसाठी जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टांकसाळे, मौदा नगरपंचायतसाठी माधुरी पालीवार, उमरेड नगरपरिषद, भिवापूर, कुही नगरपंचायतसाठी श्रीकांत शिवणकर, रामटेक नगरपरिषद, पारशिवनी नगरपंचायतसाठी राजू राऊत यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बुटीबोरी नगरपरिषदेसाठी विशाल खांडेकर निरीक्षक
काटोल, नरखेड, मोवाड नगरपरिषद व कोंढाळी नगरपंचायतसाठी बाबा गुजर, कळमेश्वर-ब्राम्हणी, मोहपा नगरपरिषदेसाठी करिश्मा चुटे, खापा, सावनेरसाठी सुनीता येरणे, वाडी नगरपरिषद, हिंगणा नगरपंचायतसाठी शहराध्यक्ष अनिल अहिरकर, वानाडोंगरी, डिगडोह (देवी) नगरपरिषद, निलडोह, गोधनी रेल्वे नगरपंचायतसाठी प्रशांत पवार तसेच बुटीबोरी नगरपरिषदेसाठी विशाल खांडेकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
भाजपने घेतली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी बैठकीतील माहिती पक्षाचे राज्य निरीक्षक व महसूलमंत्री बंद्रशेखर बावनकुळे यांना देणार असल्याचे कळविले. चर्चेनंतर यावर तोडगा काढला जाईल, असे संकेतही दिले. यावरून भाजप शेवटपर्यंत सहकारी पक्षांना चर्चेत ठेऊन ‘वेट अँड वॉच’ची भूमिका साकारणार आहे.






