उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे देखील भरपाई देण्याबाबत सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “कोल्हापुरातील सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेतला असून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधींनी प्रश्न समजून घेतले आहे. कोल्हापूर महापालिकेला अधिकची 3 एकर देऊन पाच एकर जागा महापालिकेला देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत आयुक्तांनी माहिती देऊन निधीची मागणी केलीय. तो निधी देण्याची कार्यवाही मी करेन. अंगणवाडी इमारत बांधकाम रक्कम वाढवून 15 लाख करण्याबाबत माहिती घेऊन मान्यता देण्याच्या सूचना दिल्या. पन्हाळ्यावरील काही कामांना गती देण्याचे ठरवले आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अजित पवार म्हणाले की, “क्रीडा संकुल जलतरण तलावाबाबत निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आहे तो जलतरण तलाव दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी कोल्हापूर विमानतळ 3 किमी धावपट्टी करण्याबाबत चर्चा केली. सर्किट बेंच झाल्यामुळे विमानतळाच्या सुविधा सुधारण्याची गरज आहे. सारथी उपकेंद्र कोल्हापूर आहे, त्याबाबत निधी वेळेत येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अंबाबाई मंदिर परिसर संवर्धन आणि विकास आराखडा 143 कोटींच्या कामाचं अंदाजपत्रक करण्याचं काम चालू आहे. जोतिबा देवस्थान 81 कोटींच्या कामाचं अंदाजपत्रक करण्याचं काम चालू आहे,” असे देखील अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्याबाबत सांगितले आहे.
पुढे अजित पवार यांनी कंत्राटदारांना दर्जैदार काम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले की, “कोल्हापूर शहराजवळ होणाऱ्या पुलावेळी भराव टाकण्याऐवजी इतर गोष्टी करण्याच्या गोष्टी नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. तसचं टेक्निकलबाबी तपासल्या पाहिजेत. त्याबाबत सरकारने अनेक काही गोष्ठी ठरवल्या आहेत. दर्जेदार कामं झाले पाहिजेत अन्यथा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट करण्यास मी सगळीकडे सांगतो. मी आयुक्तांना सांगितले आहे की रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत,” अशी तंबी दिली असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे गणेशोत्सवामुळे लवकर होणार आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले की, “गणेशाचं आगमन काहीच दिवसांत होत आहे, दरवेळी महिन्याचा पगार 1 तारखेला देत असतो. मात्र यावेळी गणेशोत्सव असल्याने उद्याच वेतन देण्याचा आदेश काढत आहे. यंदा 26 तारखेला सर्वांचे वेतन जाईल याचा वित्त विभागाकडून आदेश काढला जाईल,” अशी माहिती अर्थमंत्री तथा गृहमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.