रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे 'नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची एक्टिंग' -आ.गोपिचंद पडळकर
पंढरपूर / शिवाजी हळणवर : केवळ नाटक करण्यापुरतं आमदार रोहित पवारांचं आंदोलन आहे. कशी ऍक्टिंग करायची हे रोहित पवारांना चांगलं माहिती आहे. तसेच असलं शेतकऱ्यांच्या कोरड्या कळवळ्याचे नाटक कशाला करताय? हे चित्रपटाचे शूटिंग आहे का? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे का ? अशा परखड शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे.
तसेच रोहित पवारांना आपलं आवाहन आहे, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानादार एफआरपी देत नाहीत, तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं. सोलापूर जिल्हा पोलीस प्रमखांना आपली मागणी आहे, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून, रोहित पवार यांना अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका. रोहित पवारांना एक-दोन महिने आंदोलनला बसू द्या, असे देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. त्याचबरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय, अशी घणाघाती टीका देखील पडळकर यांनी केली आहे, ते ‘नवराष्ट्र’शी बोलत होते.
रोहित पवारांना माझे आव्हान आहे की, जोपर्यंत साखर कारखान्याने एफआरपी दिलेली नाही ती एफआरपी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे, सोलापूर एसपी साहेबांना माझी विनंती आहे. पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारांच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका, नुसत्या बातमीपुरत, नाटक करण्यापुरतं, रोहित पवाराचं हे आंदोलन आहे, ते होता कामा नये. रोहित पवारांनी व पवार कुटुंबांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात म्हणजे ६ कोटीपासून यांनी ढापलेत. जे कारखाने 100 ते 200 कोटीचे कारखाने कशाला ढापले ?तुम्ही हे नाटक करताय हे काय पिक्चरच शूटिंग चालू आहे का? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं सुरू
30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु, या कर्जमाफीमधील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही. तर कर्जमाफीच्या GR मध्ये २०१९ मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजारापर्यंत लाभ देण्याची अट आणि प्रोत्साहन अनुदान देताना २०२५-२६ आणि २०२६-२७ चं पीक कर्ज भरणं अनिवार्य केल्याची अट आहे. या दोनच अटींमुळं सुमारे ३७ लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं या दोन जाचक अटी आधी काढा, एवढीच आमची साधी सरळ मागणी आहे. तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार नाही, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून, या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.






